पुणे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : पहिल्याच दिवशी 20 उमेदवारी अर्जांचे वाटप

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि. 31) पहिल्याच दिवशी इच्छुकांनी तब्बल 20 अर्ज नेले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी या राजकीय पक्षासह 14 अपक्ष इच्छुकांचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी मंगळवार (दि. 31) अर्ज वाटप व स्वीकृतीस सुरुवात झाली. थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात कामकाज सुरू करण्यात आले आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज वाटप व स्वीकृती केली जात आहे.

मंगळवारी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका माया बारणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य संभाजी बारणे असे तिघांनी अर्ज घेतले. भाजपकडून बायडाबाई काटे यांनी एक अर्ज नेला. वंचित बहुजन आघाडीकडून रवींद्र पारदे, 'एमआयएम'कडून जावेद शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून अनिल सोनवणे, पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीकडून रावसाहेब चव्हाण, अल्पसंख्याक विकास महासंघाकडून रफिक कुरेशी यांनी अर्ज नेला.

तसेच, अपक्ष म्हणून प्रफुल्ला मोनलिंग, हरिभाऊ मोरे, मिलिंद भोसले, बाळू शिंदे, दादाराव कांबळे, वहिदा शेख, अविनाश गायकवाड, अजय लोंढे, सुधीर जगताप, सुधीर जगताप, बालाजी जगताप, सालारभाई शेख यांनी अर्ज नेला आहे. उमेदवारीअर्ज वाटप व दाखल करण्यास मंगळवार (दि. 7) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालय बंद राहणार आहे.

उमेदवारांना हवेत मतदारसंघातील दहा सूचक
राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदारसंघातील एक सूचक असावा लागतो. अपक्ष उमेदवारांना मतदारसंघातील दहा सूचक आवश्यक आहे. राजकीय पक्षाना मूळ ए व बी फॉर्म शेवटच्या मुदतीपूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे. अर्ज दाखल करताना सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवारासाठी 10 हजार रुपये व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी 5 हजार रुपये रोख स्वरूपात कार्यालयात भरणे आवश्यक आहे. अ

र्ज दाखल करताना सर्व बँक खात्याचा तपशील देणे बंधनकारक आहे. तीन महिन्यांच्या कालावधीतील छायाचित्र अर्जासोबत द्यावा. सोबत 100 रुपयांच्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रात त्याची सर्व संपत्ती व मालमत्ता, दायित्व, कर्ज, शैक्षणिक व गुन्हेगारीविषयी माहिती देणे आवश्यक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT