मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, वानवडी व रामटेकडी परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत केबलचे जाळे तयार झाले आहे. एका इमारतीवरून दुसर्या इमारतीवर तसेच मुख्य व अंतर्गत रस्त्यावरून या केबल टाकण्यात आल्या आहेत. लोंबकळत असलेल्या या केबलमुळे अनेकदा धोकादायक प्रसंग निर्माण झाले आहेत.
अनधिकृत केबलवर काय कारवाई करायची याची नियमावली महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे परिसरात अनधिकृत केबलचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. या केबल टीव्ही, इंटरनेट व विजेच्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी महापालिकेचा विद्युत विभाग व पथ विभागाकडे अनधिकृत केबलवर कारवाई करण्याची मागणी केली असता हे आमचे काम नाही, असे सांगून या दोन्ही विभाग हात झटकत आहेत. याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना विचारले असता हे काम महापालिकेचे नसल्याने त्यांनी सांगितले.
…ग्राहकांच्या घरामध्ये केबलमार्फत कनेक्शन देताना जसे शक्य होईल त्या पध्दतीने झाडे, विजेचे खांब व इमारतींवरून या केबल टाकल्या जात आहे. या केबल तुटल्याने अनेकदा अपघातसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाली आहे. अनधिकृत केबलच्या जाळ्यांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने यातून काही दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.