घरगुती गणेशोत्सवावर पीओपीबंदीचे विघ्न; राज्यातील ऐंशी टक्के मूर्तिशाळांमध्ये काम ठप्प Pudhari
पुणे

घरगुती गणेशोत्सवावर पीओपीबंदीचे विघ्न; राज्यातील ऐंशी टक्के मूर्तिशाळांमध्ये काम ठप्प

तीन महिन्यांत लाखो मूर्ती घडविण्याचे कारागिरांपुढे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: गणेशोत्सव आला की पीओपी की शाडू मातीच्या मूर्ती? यावर चर्चा सुरू होते. काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीची यंदा महापालिकेने काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पीओपीच्या मूर्तींचे नदी, विहिरीत विसर्जन न करता मूर्तिदान, हौदात किंवा अमोनियम बायकार्बोनेटद्वारे बादलीत विसर्जन आदी पर्यायांना अधिकाधिक पसंती मिळून प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघत असताना पुन्हा पीओपीबंदीने डोके वर काढले आहे.

प्रशासनाने मोहीम तीव्र केल्याने राज्यातील ऐंशी टक्के मूर्तिशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवावर पीओपीबंदीचे विघ्न समोर ठाकले आहे.शहरातील मूर्तिशाळांमध्ये सहा इंचांपासून दहा फुटांपर्यंतच्या मूर्ती घडविल्या जातात. यामध्ये 80 टक्के मूर्ती या पीओपी, तर 20 टक्के मूर्ती या शाडूपासून घडविण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शाडू मूर्तीच वापरा, पीओपी नको, अशी मोहीमच प्रामुख्याने पर्यावरणवादी संस्थांनी उघडली होती.

पीओपीच्या मूर्ती पाण्यात सहजी विरघळत नसल्याने तसेच त्यांच्यावर रासायनिक रंग असल्याने नैसर्गिक जलस्रोत खराब होतात. त्यामुळे साहजिकच पाण्यात चटकन विरघळणार्‍या मातीच्या मूर्तींचा आग्रह धरला जात होता. तथापि, गेल्या काही वर्षांमधील प्रबोधनाच्या मोहिमेमुळे नैसर्गिक जलस्रोताचा वापर कमालीचा मंदावल्याचे दिसून येते.

याखेरीज मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती पीओपीच्या नसाव्यात, असे आदेश दिल्याने त्याचीही पूर्तता झाली. मात्र, स द्:स्थितीत शहरात गणेशमूर्तींची वाढती मागणी, त्यात अपुर्‍या मनुष्यबळावर शाडूच्या माती घडवायच्या कशा? हा प्रश्न मूर्तिकारांना सतावत आहे.

सार्वजनिक मंडळांचा कल फायबरकडे

मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळ प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने बहुतांश मंडळांनी आपला कल फायबरच्या मूर्ती करण्याकडे दिसून येत आहे.

शहरातील बहुतांश जुन्या मूर्ती या कागदी लगदा, भुसा, लाकडापासून तयार करण्यात आल्या आहेत. तर, पीओपीच्या मूर्ती हाताळताना येणार्‍या अडचणी तसेच प्रदूषणाचा प्रश्न, या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू झालेल्या मंडळांचा कल पीओपीऐवजी फायबरच्या मूर्ती करवून घेण्याकडे दिसून येत आहे.

पुण्यासाठी 48 लाख किलो शाडूची गरज

शहरात जवळपास सहा लाखांहून अधिक घरात बाप्पाचे आगमन होते. साधारणत: एक फुटाच्या गणेशमूर्तीसाठी जवळपास सात ते आठ किलो शाडू लागतो. पीओपीबंदीच्या पार्श्वभूमीवर शाडूचा आग्रह धरल्यास फक्त शहरासाठी 48 लाख किलो शाडूची आवश्यकता भासेल. दरवर्षी एवढ्या प्रमाणात शाडूची उपलब्धता होण्याची शक्यता कमी आहे. याखेरीज शाडू माती ही चिकट गुणधर्माची आहे.

त्यामुळे तिचे नदीत विसर्जन करणेही पर्यावरणासाठी घातक आहे. या मूर्तींचे कृत्रिम हौद, विहिरी, तलाव तसेच अन्य ठिकाणी विसर्जन झाल्यास त्यापासून निर्माण होणारा गाळ काढण्याचे काम तिच्या चिकटपणामुळे त्रासदायक तसेच मोठे खर्चीक ठरेल. शाडूचा वापर करायचा झाल्यास येत्या दोन ते तीन वर्षांच्या काळात त्यावरही बंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याउलट पीओपीच्या मूर्तीचे नव्या पध्दतीने विसर्जन केल्यानंतर तिची विल्हेवाट लावणेही सहजशक्य होत असल्याचे शहरातील मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.

फक्त 5 टक्के पीओपी मूर्तींसाठी

पीओपी जिप्सम रॉकमधून काढला जातो. त्यात कॅल्शियम आणि सल्फेट असतात. पीओपीची सेटिंग विस्तारासह होते आणि त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो. या गुणवत्तेमुळे पीओपी मोल्डमध्ये वापरला जातो. पीओपीचा वापर कागद, साबण आणि कुंभारविषयक उद्योगांमध्ये केला जातो. हा अस्थिभंग हाडांच्या शरीरावरचा भाग लपेटण्यासाठी वापरला जातो. पीओपी क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. एकूणच, पीओपी वापराच्या तुलनेत फक्त 5 टक्के पीओपी मूर्तींसाठी वापरला जातो.

गुजरातमध्ये मिळते शाडूची माती

शाडू हा नैसर्गिक स्रोत आहे. गणेशमूर्तीसाठी वापरण्यात येणारी शाडू माती गुजरात राज्यातील भावनगर येथील खाणीतून उपलब्ध होते. घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पांढर्‍या शाडू मातीचा पुरवठा गुजरात राज्यातून होतो. शाडू माती हा चिकण मातीचा एक प्रकार आहे. ती जमिनीपासून दहा फुटांच्या अंतरावर उपलब्ध होते. दगड स्वरूपात असलेली शाडू दळल्यानंतर तिची पावडर तयार होते. ही माती शेतीच्या दृष्टीने काही प्रमाणात उपयोगी असते. त्याचा कुठे वापर होतो, त्यावर शाडूचे महत्त्व अवलंबून आहे. त्यामध्ये बी टाकले तरी ते रुजत नाही.

निम्म्याहून अधिक गणेशभक्त राहणार वंचित

महापालिका प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी केल्याने शहरातील मूर्तिशाळांमध्ये मूर्ती घडविण्याचे काम थांबले आहे. सद्य:स्थितीत शाडूच्या मूर्तींचे काम सुरू केल्यास त्यास केवळ तीन महिने अवधी मिळणार आहे. या वेळी मूर्तिकारांना मूर्ती तयार करत त्याची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास फक्त तयार केलेल्या मूर्ती पावसाळ्यात ओल पकडून भंगण्याची शक्यता मूर्तिकारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काळात पीओपीवरील बंदी न उठल्यास निम्म्याहून अधिक गणेशभक्तांना घरगुती गणेशोत्सवापासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

मागील काही वर्षांत शहरात या पद्धतीने होते विसर्जन

  • अमोनियम बायकार्बोनेटद्वारे घरच्या घरी विसर्जन

  • नदीकिनारच्या अथवा फिरत्या कृत्रिम हौदाचा वापर

  • विसर्जनस्थळी संस्थांकडे मूर्तिदान करत विसर्जन

गणेशोत्सवादरम्यान शहरात विराजमान होणार्‍या गणेशमूर्ती

घरगुती सुमारे 7 लाख

सार्वजनिक सुमारे 10 हजार

पीओपी मूर्ती 6 लाखांहून अधिक

शाडू मूर्ती 70 ते 80 हजारांहून अधिक

शाडूच्या मूर्ती घडविण्याचा विचार केल्यास यातून मूर्तिकारांना चांगले पैसे मिळतील, यात काही शंका नाही. मात्र, शहरात घरगुती मूर्तींची वाढती मागणी पाहता फक्त शाडूवर अवलंबून राहणे शक्य नाही. शाडूचा आग्रह झाल्यास मूर्तींची संख्या कमी होऊन किमती वाढतील. त्यामुळे गोरगरिबांना सण साजरा करणे शक्य होणार नाही. पीओपी मूर्तीच्या पर्यावरणपूरक विसर्जनाच्या पध्दतींचा पुणेकरांनी अवलंब केला आहे. याखेरीज पीओपी रिसायकलिंगचा प्रकल्पही उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. सद्य:स्थितीत जवळपास चार ते पाच प्रकारे पीओपींच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडते. त्यामुळे या गोष्टींचाही विचार होणे आवश्यक आहे.
- गणेश कुंभार, मूर्तिकार, जय गणेश आर्ट्स, लोहगाव
शाडू मातीची मूर्ती घडविताना कस लागतो. त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याने पीओपीच्या तुलनेत ती महाग ठरते. नैसर्गिक स्रोतांऐवजी अन्य पर्याय उपलब्ध झाले असले, तरी ते प्रशासनासाठी खर्चीकही ठरतात. त्यामुळे नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. तसेच, पीओपीचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून शाडूच्या मूर्ती वापराकडे वळण्याची आवश्यकता आहे. पीओपी असो की शाडू, गणेशोत्सव साजरा होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. त्यादृष्टीने याबाबतीतही विविध पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे.
- अश्विनी कुदळे, मूर्तिकार, आराध्या कलादालन, दिघी
पीओपी पर्यावरणाला घातक आहेच; याखेरीज मूर्तिकारांच्या दृष्टीनेही कलेचा नाश पावणारी आहे. कलेचा अधिपती असलेल्या बाप्पाला घडविण्याची कलाही पीओपीमुळे लुप्त होत चालली आहे. रबराच्या मोल्डमध्ये पीओपी ओतून मूर्ती करून पैसा कमावायचा, हा प्रकार सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रत्येक जण जशी सजावट करतो, त्याप्रमाणे गणेशमूर्ती घडविण्याचा प्रयत्न गणेशभक्तांकडून झाल्यास पर्यावरण गणेशोत्सव साजरा होऊन पीओपीचा प्रश्न सुटेल. सद्य:स्थितीत शाडू, लाल माती, कागद याखेरीज शेणापासूनही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या जातात. पीओपीबंदीमुळे गणेशमूर्ती उपलब्ध होणार नाहीत, हे मान्य. मात्र, शाडूसह कागद, लाल माती तसेच शेणापासून गणेशभक्तच मूर्ती घडवू लागले, तर कलाही जोपासली जाईल आणि एक वेगळा अनुभवही येईल.
- अभिजित धोंडफळे, मूर्तिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT