पुणे

पुणे : कचर्‍याला आग लावून विल्हेवाट

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोडवरील धायरी, खडकवासला परिसर चकाचक करण्यासाठी प्रशासन रस्त्यावर उतरले आहे, तर दुसरीकडे मुठा कालव्यालगतच्या नांदेड फाटा-दळवीनगर ते धायरी रस्त्यावर कचर्‍याची आग लावून विल्हेवाट लावली जात आहे. कचर्‍याचे मोठमोठे ढीग रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडले आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरत असल्याने स्थानिक रहिवाशांना तसेच ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रास होत आहे. कचर्‍याच्या ढिगार्‍यांना आग लावणारे सापडत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणाचा मुठा कालवा कचर्‍याच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी दूषित होत असून, खडकवासलापासून नांदेड फाटा, धायरी वडगाव, हिंगणेपर्यंत कालवातीरावर राडारोडा, कचर्‍याचे ढीग साठले आहेत. कचरा गोळा करूनही दुसर्‍या दिवशी कचरा साठत आहे. काही नागरिक, पर्यटक तसेच काही स्थानिक व्यावसायिक प्लास्टिकच्या पिशव्यांत कचरा फेकतात. सडलेले खाद्यपदार्थ, मांस, बाटल्या अशा कचर्‍याचे प्रमाण वाढले आहे. कालव्याशेजारच्या सिंहगड रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती वाढली आहे. त्याबरोबर रस्त्यावर तसेच कालव्यात कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले, मकालव्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवून कचर्‍याला प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्यासाठी खडकवासला जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली आहे. जलसंपदा विभाग याबाबत सकारात्मक असून, मंजुरी मिळाल्यानंतर पालिका स्वखर्चाने कालवातीरावर लोखंडी जाळ्या बसविणार आहे. कालव्यातील कचर्‍याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र
संघटक सचिव दत्तात्रय कोल्हे यांनी केली होती.

कचर्‍याची समस्या दीर्घकाळापासून
1997 मध्ये पालिकेत नांदेड फाटा दळवीनगर ते धायरी परिसराचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून नांदेड फाटा ते धायरी-डीएसके रस्त्यावर कचर्‍याची समस्या आहे. कालव्यासह रस्त्यावरील सडलेला कचरा काढण्यासाठी सफाई कामगारांना नाक-तोंड बांधून मोठी कसरत करावी लागत आहे. कचरा काढल्यानंतर पुन्हा दोन-तीन दिवसांत कचर्‍याचे ढीग साठत आहेत. या कचर्‍याला आगीही लावल्या जात आहेत.

SCROLL FOR NEXT