काळजी घ्या! वातावरणातील बदलांमुळे आजार बळावले Pudhari
पुणे

काळजी घ्या! वातावरणातील बदलांमुळे आजार बळावले

आरोग्याची काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मंचर: उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी उष्णता असे वातावरण होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने लहान मुलांना उलट्या, जुलाब, ताप येणे असे आजार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

मार्च महिना सुरू झाल्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दुपारच्या सुमारास कडकडीत ऊन पडत आहे. सायंकाळी उष्णता असते, तर पहाटे पहाटे थंडी पडत आहे. अशा या वातावरणाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. अनेकजण आजारी पडले आहेत.

मुख्यत्वेकरून शाळेत जाणार्‍या लहान मुले, विद्यार्थी यांना उष्णतेमुळे उलट्या, जुलाब, ताप हे आजार होत असून, ज्येष्ठ नागरिकांना अशक्तपणा, चक्कर येणे, भूक न लागणे असे प्रकार जाणवू लागले आहेत. महिलांना गुडघेदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी याच्या समस्या जाणवत आहेत.

गावगावच्या रुग्णालयांत रुग्ण उपचार घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी या आजारांनीदेखील अनेक रुग्ण बेजार झाले आहे. फॅमिली डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल होत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मंचर येथील डॉ. नरेंद्र लोहकरे यांनी केले.

दिवसा बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा. शरीराच्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार्‍या भागांवर सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचे संरक्षण होईल, असे मंचर येथील त्वचा तज्ज्ञ डॉ. संतोष शिंदे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे घाला. सैल आणि सुती कपडे परिधान केल्याने घाम लवकर सुकतो, असे मंचर येथील विनायक हॉस्पिटलचे डॉ. विनायक खेडकर यांनी सांगितले.

उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो घरातच राहा. उन्हाच्या वेळी घर किंवा ऑफिसच्या बाहेर जाणे टाळा. दिवसा घर थंड ठेवण्यासाठी पडदे काढा. रात्री थोडा वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडा जेणेकरून घर थंड होईल. गरजेनुसार एसी, पंखा आणि कुलर वापरावे.
- डॉ. प्रशांत आणि प्रीतम गाडे, सार्थक हॉस्पिटल, मंचर
उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत दररोज दोन-तीन लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक, नारळपाणी, रस, लिंबू व इतर द्रवपदार्थांचे सेवन करावे.
- डॉ. भूषण साळी, गेटवेल हॉस्पिटल, मंचर
उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. हिरव्या भाज्या, काकडी, टोमॅटो, बाटली, लौकी, पुदिना यांसारख्या भाज्यांचे सेवन करा. टरबूज, खरबूज, संत्री, डाळिंब यांसारखी रसदार फळे खा. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखली जाईल आणि तुम्ही डिहायड्रेशनपासून सुरक्षित राहाल.
- डॉ. हर्षद शेटे, संजीवन हॉस्पिटल, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT