पुणे

खडकवासला धरणातून मुठा कालव्यात विसर्ग

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : पानशेत, वरसगावसह मुठा खोर्‍यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणात सोमवारी सायंकाळी पाच वाजता 81.43 टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे सायंकाळी सातपासून धरणातून मुठा कालव्यात विसर्ग सुरू करण्यात आला. दिवसअखेर खडकवासला धरणसाखळीत 17.21 टीएमसी (59.03 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
खडकवासला धरण मंगळवारी (दि. 25) शंभर टक्के भरल्यास मुठा कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कालव्यात पाणी सोडल्याने जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीसह पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. रविवारी (दि. 23) सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहापर्यंत (24 तासांत) पानशेत येथे 104 मिलिमीटर, वरसगाव येथे 105, टेमघर येथे 70 व खडकवासला येथे 25 मिलिमीटर पाऊस पडला.

सकाळी आठपासून पावसाचा जोर कमी झाला. मात्र, रात्री आठनंतर पुन्हा संततधार सुरू झाली. त्यामुळे चारही धरणांत पाण्याची वेगाने भर पडत आहे. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या टेमघर येथे 25, वरसगाव येथे 22, पानशेत येथे 24 व खडकवासला येथे 3 मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, गेल्या वर्षी 24 जुलै रोजी धरणसाखळीत 20.48 टीएमसी (70.28 टक्के) इतका पाणीसाठा होता.

गेल्या चोवीस तासांत दीड टीएमसीची भर

गेल्या 24 तासांत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात दीड टीएमसीपेक्षा अधिक भर पडली. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 15.62 टीएमसी इतके पाणी होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच एका दिवसात पानशेत, वरसगाव येथे शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

धरणांतील पाणीसाठा
टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर
1.51 (40.71)
वरसगाव
7.39 (57.68)
पानशेत
6.70 (62.89)
खडकवासला
1.61 (81.43)

खडकवासला धरणातून सोमवारी सायंकाळी सात वाजता कालव्यात 302 क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करून मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत 1005 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.

-मोहन भदाणे,
उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT