पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात येणार्या परीक्षांमध्ये नवीन वर्णनात्मक प्रश्नपत्रिका स्वरूप 2023 पासूनच लागू करावे. या मागणीसाठी पुण्यात पुन्हा शुक्रवारी परीक्षार्थींनी टिळक चौकात आंदोलन केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परीक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी केली आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2025 पासून नव्हे, तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे सरकारला नाही. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणे म्हणजे आयोगाच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचे परीक्षार्थींनी स्पष्ट केले आहे; परंतु यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये परीक्षेच्या स्वरूपावरून संभ—म निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.