किशोर बरकाले
राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तथा विकास सोसायट्यांसाठी सहकारी जिल्हा संवर्ग योजना (केडर) स्थापण्याबाबतची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. त्यानुसार विकास सोसायट्यांच्या सचिवांची भरती ही जिल्हा देखरेख सहकारी संस्था सरळ सेवेद्वारे अथवा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेने नियुक्त केलेल्या सचिवांमधून नामनिर्देशनाद्वारे भरती करेल.
शासन नेमणूक करावयाच्या गटसचिवांची संख्या, त्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, भरती व नामनिर्देशनाची कार्यपद्धती आणि सेवेच्या शर्तीबाबत सर्वसाधारण किंवा विशेष मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल, असे त्यामध्ये नमूद केले आहे. राज्य सरकारने दिनांक 9 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व संबंधितांकडून दिनांक 9 नोव्हेंबरपर्यंत अपर मुख्य सचिव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, विस्तार, मुंबई 400 032 या पत्त्यावर मसुद्याच्या अनुषंगाने हरकती व शिफारसी प्राप्त झाल्यास शासनामार्फत त्या विचारात घेण्यात येणार आहेत.
या सुधारणांबाबतचे विधेयक मार्च 2024 मध्ये मंजूर झाले होते. जिल्हा देखरेख सहकारी संस्था अधिनियमाचे कलमांन्वये गठित ‘सहकारी जिल्हा संवर्ग सेवायोजन निधी’ या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते सुरू करेल. त्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, मागील वर्षीच्या वार्षिक वेतनाच्या आधारे, संस्थेवर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडील प्रतिनियुक्तीवर काम करणार्या सचिवाच्या 15 महिन्यांच्या वेतनाइतपत व अन्य देय भत्त्याइतपत रक्कम सहकारी जिल्हा संवर्ग सेवायोजना निधी या खात्यात जमा करील. परंतु, जिल्हा देखरेख सहकारी संस्थेने विकास सचिवास एकापेक्षा अधिक संस्थेत नेमणूक केली असल्यास या अंशदानाची रक्कम संबंधित संस्थांमध्ये त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार विभागण्यात येईल.
प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेमार्फत या निधीमध्ये द्यावयाचे अंशदान भरणा न केल्यास संबंधित जिल्हा देखरेख सहकारी संस्थेला संस्थेवर प्रतिनियुक्तीने नियुक्त केलेल्या सचिवास परत बोलविता येईल, अशी महत्त्वपूर्ण तरतूद यामध्ये केली आहे. तसेच, जिल्हा देखरेख सहकारी संस्थेस संलग्न असलेली प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संवर्ग सेवायोजन निधीमध्ये जमा करावयाची अंशदानाची रक्कम प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबरपूर्वी भरणा करेल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.