पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या एका गंभीर वादात सापडले आहे. गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत रुग्णालयाला गंभीर दोषी ठरवण्यात आले असून, रुग्णालयाकडून वैद्यकीय सेवा देण्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Dr. Sushrut Ghaisas Resignation
या पार्श्वभूमीवर डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास हे या प्रकरणात मुख्य डॉक्टर होते. गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्यावर उपचार सुरू करण्याआधी त्यांच्याकडून ₹१० लाख रुपये आगाऊ रक्कम मागीतल्याचा आरोप डॉ. घैसास यांचा आहे.
चौकशी अहवालानुसार, तनिषा भिसे यांना सकाळी ९ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दुपारपर्यंत म्हणजे २.३० वाजेपर्यंत प्राथमिक उपचारही करण्यात आले नव्हते. यासोबतच, ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला नेण्यापूर्वी डॉक्टरांनी १० लाख रुपयांची मागणी केली, दरम्यान, कुटुंबीयांकडे फक्त ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे रुग्ण व कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण झाला. रुग्णासमोरच ही आर्थिक मागणी झाल्यामुळे रुग्णाची मानसिक स्थिती ढासळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, रुग्णालयाने वेळेवर योग्य उपचार न दिल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यांनी सांगितले की अंतिम आणि सविस्तर अहवाल संध्याकाळी प्रसिद्ध केला जाईल.
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, डॉक्टरांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही. सरकारने यात तात्काळ कृती केली पाहिजे. एका स्त्रीचा जीव गेला आहे, हे सरकारचे आणि रूग्णालयाचे अपयश आहे, जर समितीचा अहवाल दोष दाखवत असेल, तर ज्यांच्यामुळे मृत्यू झाला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे." सीसीटीव्हीमध्ये जे कोणी दिसेल त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत पुढे सुप्रिया सुळे यांनी सरकारला उद्देशून प्रश्न विचारला – “समितीचा अहवाल समोर आला आहे, मग सरकार अजूनही कारवाईसाठी का थांबत आहे?” असा सवाल त्यांनी केला.