मंचर: आंबेगाव, जुन्नर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या चार दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे.
धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ६) १४.१२ टक्के असलेला पाणीसाठा गुरुवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत ४६.७७ टक्क्यांवर पोहचला आहे.
कोढवळ, असाणे, आहुपे, माळीण, बोरघर आदी पाणलोटक्षेत्रात गेल्या चार दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली. या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओढे-नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणाच्या पाणीसाठ्याची टक्केवारीही झपाट्याने वाढत आहे. ६ जुलै रोजी १४.१२ टक्के, ७ रोजी २३ टक्के, ८ रोजी ४४.१५ टक्के आणि ९ रोजी ४६.७७ टक्के इतका साठा नोंदविण्यात आला.
यंदा पावसाला जवळपास सव्वा महिन्याचा विलंब झाला. त्यामुळे अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा अद्याप कमी आहे. ९ जुलै २०२५ रोजी डिंभे धरणात ६४.७१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा सुमारे २० टक्के कमी साठा आहे.