पुणे: सध्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने गुन्हेगार ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप वळसे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने न्यायालयात गुन्हेगार ठरविलेले नाही. न्यायालायने काही निर्णय दिला असता तर राजीनामा देणे योग्य ठरले असते. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या अधिपत्याखाली ही समिती आहे. त्यामुळे या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्याबाबत बोलताना ’अशा गोष्टी घडत असतात. त्यातून एकत्र बसून सर्व नेते मार्ग काढतील,’ असे उत्तर त्यांनी दिले.
बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आल्याने बीडमधील गुन्हेगारांना शंभर टक्के शिक्षा होईल, असा दावाही त्यांनी केला. सन 2019 मधील पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांच्या विरोधातील षड्यंत्र होते. हे षड्यंत्र कोणी रचले, हे माहिती नाही. मात्र, सन 2019 मध्ये बैठका सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्या वाद झाला होता.