भीमाशंकर: आदिवासी भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी माजी सहकारमंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तर, शेतकऱ्यांना बांधबंदिस्तीसाठी सी. एस. आर व भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून ७५ टक्के मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी स्वतः चार २५ टक्के हिस्सा देऊन शेती भातलागवडीयोग्य करावी तसेच भातरोपे कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावीत, असे या पाहणीदरम्यान कृषी विभाग यांना सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील भातशेती आणि बांधबंदिस्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाहणीदरम्यान वळसे पाटील यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. भातलागवडीसाठी आवश्यक भातरोपे कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावीत तसेच महसूल विभागाने त्यासाठी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
भातशेतीबरोबरच आदिवासी भागातील रस्ते, सार्वजनिक मालमत्ता आणि वीजयंत्रणेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग, कृषी विभाग आणि महावितरण यांनी नुकसानग्रस्त कामांचे अंदाजपत्रक तयार करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच गरजेनुसार नवीन कामांना मंजुरी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
आदिवासी जनतेसोबत मी आणि शासन ठामपणे उभे आहोत. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन वळसे पाटील यांनी या वेळी दिले.
या पाहणी दौऱ्यात माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, उपसभापती ज्योती प्रवीण पारधी, जिल्हा परिषद सदस्या शीला लोहकरे, इंदूबाई लोहकरे, प्रदीप आमोंडकर, घोडेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार, तहसीलदार राहुल सारंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सूर्यकांत कुंभार, महेश परदेशी, प्रकल्पाधिकारी गणेश इवनाते, संदीप पाटील आदींसह कृषी विभाग, महावितरण विभाग, पंचायत समितीचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.