बावडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निरनिमगाव (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या वतीने अत्याधुनिक शैक्षणिक आणि भौतिक सुविधांनी युक्त अशा दोन डिजिटल अंगणवाड्या साकारण्यात आल्या आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्पअंतर्गत निरनिमगाव गावठाण व खडाप्पा या ठिकाणी दोन्ही अंगणवाड्या चालविल्या जात आहेत.
यामध्ये मुलांचा वयोगट ओळखून हसत-खेळत त्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या अंगणवाड्या डिजिटल असून भिंतीदेखील बोलक्या आहेत. मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत. वर्गात सोलरद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. सरपंच व निरा-भीमा कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून या अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी ग्रामविकास अधिकारी सागर सवासे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले.