पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे' असे म्हणत रविवारी (दि.25) प्रभू येशू यांच्या जन्माचे स्वागत होणार आहे. ख्रिसमसनिमित्ताने घराघरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, आकाशकंदीलाचा प्रकाश, पेस्ट्रीज- केकचा गोडवा आणि तरुणाईची 'ख्रिसमस पार्टी'ची तयारी पू़र्ण झाली आहे.
यंदा ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आदल्या दिवशीच काहींनी फिरण्यासाठीचे ठिकाण गाठले असून, काहीजण घरामध्ये ख्रिसमस पार्टीचा आनंद घेणार आहेत. तर चर्चही विद्युत रोषणाईने झगमगले आहेत. चर्चमध्ये सकाळी भक्ती आणि त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने चर्चमध्ये फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
कॅम्पसह फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन आदी ठिकाणी रात्री रंगणारे सेलिब्रेशनही यंदा पाहायला मिळणार आहे. ख्रिसमसची तयारी शहरातील चर्चसह घराघरांमध्ये करण्यात आली आहे. चर्चमध्ये दिवसभर कँरल गीते (आनंद गीते) आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी होणार्या भक्तीत समाजबांधव सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने घराघरांमध्येही 'ख्रिसमस ट्री' ही सजविण्यात आले आहेत. रंगबेरंगी मेणबत्त्या प्रज्वलित करून प्रार्थना करण्यात येणार आहे.
काही घरांमध्ये देखावेही तयार करण्यात आले आहेत. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील लोक गुडी बॅगमधून लहान मुलांना भेटवस्तू देणार आहेत. त्याशिवाय लाल रंगाच्या संकल्पनेप्रमाणे तरुणाई पेहराव करणार आहे. त्या संकल्पनेप्रमाणे पार्टीही रंगणार आहे. केकसह शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीची ऑर्डरही देण्यात आली आहे. मध्यवर्ती पेठांसह कॅम्प, कोरेगाव पार्क, खडकी, येरवडा, औंध, डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता येथील रस्ते आणि दालने आनंदोत्सवात रंगले आहेत.