पुणे

Pune : धोम-बलकवडीचे आवर्तन लांबले

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  धोम-बलकवडी धरणातून कालव्यासाठी आवर्तन सोडण्यात दिरंगाई होत असल्याने भोर तालुक्यातील वीसगाव, चाळीसगाव खोर्‍यातील रब्बी हंगामातील पिके पाण्याअभवी सुकू लागली आहेत. बंधार्‍यांसह विहिरींची पाणीपातळी घटू लागल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, आवर्तनाचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांची बैठक होत नसल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नसल्याचे सातारा जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. भोर तालुक्यातील वीसगाव, चाळीसगाव खोर्‍यात दरवर्षी रब्बी पिकांसाठी पाण्याचा अभाव भासतो. सध्या धोम-बलकवडी धरणाचे पहिले आवर्तन सोडले नसल्याने बंधारे कोरडे पडले आहेत. विहिरी आटल्या असून, पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. परिणामी, कोणी पाणी देता का पाणी? असे म्हणण्याची वेळ या भागातील शेतकर्‍यांवर आली आहे.

धोम-बलकवडी धरण झाल्यापासून धरणाच्या उजवा कालव्याला दरवर्षी रब्बीतील पिकांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडले जाते. यामुळे विसगाव खोर्‍यातील नेरे, आंबाडे, पाले, पळसोशी, धावडी, बाजारवाडी खानापूर, बालवडी, वरवडी भाबवडी तर चाळीसगावमधील टिटेघर, रावडी, कर्नावड, वडतुंबी, आंबवडे येथील शेतकर्‍यांच्या 950 हेक्टरवरील रब्बी पिकांना पाणी मिळते. मात्र, यंदा धोम-बलकवडी धरण कालव्याला पाणी सोडले नसल्याने शेतकर्‍यांना शेतीसाठी, नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वन्यप्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आवर्तनासाठी उग्र आंदोलन छेडणार
रब्बी पिके जळून जात आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. सातारा जलसंपदा विभागाने लवकरात लवकर धोम-बलकवडी धरणाच्या उजवा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडावे; अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या भागातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

आमच्या हक्काचे पाणी द्या
धोम-बलकवडी धरणाच्या उजवा कालव्यासाठी नेरे, पाले, आंबाडे, पळसोशी, गोकवडी, निळकंठ, रावडी, कर्णावड, खानापूर, टिटेघर, चिखलगाव येथील शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. आमचे हक्काचे पाणी आम्हाला द्या, अशी आर्त हाक विसगाव, चाळीसगाव खोर्‍यातील शेतकर्‍यांकडून शासनास दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.