पुणे

पुण्यात ढोल-ताशा पथकांचा सराव दणक्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पथकांचा सराव आणि ढोल-ताशांचा निनाद ठरलेलाच….हाच ठेक्यांचा निनाद डेक्कन नदीपात्रात ऐकायला मिळत आहे…कारण ढोल-ताशाच्या पथकांच्या सरावाला दणक्यात सुरुवात झाली आहे. तरुणांचा सळसळता उत्साह आणि जोश सरावातही पाहायला मिळत आहे, प्रत्येकजण नव्या आत्मविश्वासाने वादन करताना पाहायला मिळत आहे. उपनगरांत 15 दिवसाआधीच पोलिसांची परवानगी नसतानाही सराव सुरु झाला खरा पण पोलिसांच्या परवानगीनंतर बुधवारी अधिकृतपणे पथकांनी सराव सुरु केला आहे आणि पथकातील तरुणाई नव्या उर्जेने वादन करत आहे. पहिल्याच दिवशी वादनाचा सराव तरुण-तरुणींनी मोठ्या जल्लोषात केल्याचे पाहायला मिळाले.

गणेशोत्सवाच्या एक महिना आधी ढोल-ताशा पथकांतील तरुणाईच्या सरावाला सुरुवात होते. यंदा वादनाचा या निनादाला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल वादनात व्यग्र असलेल्या तरुणी, वरिष्ठांकडून ताशा वादनाचे बारकावे समजून घेताना तरुण, नावनोंदणी करणारे पथकातील समन्वयक….असे चित्र पहिल्या दिवशी पथकांच्या सरावाच्या ठिकाणी पाहायला मिळाले. पथकात नव्या वादकांसाठीची नावनोंदणीची लगबग आणि ध्वज पथकाचा सरावही पाहायला मिळाला. यंदा महाविद्यालयीन तरुण असो वा आयटीतील नोकरदार वर्गाचा पथकांत सहभाग दिसून येत असून, सरावात तरुण वादकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

शंभो वाद्य पथकातील श्वेताली भिलारे म्हणाली, पथकाचा सराव दणक्यात सुरु झाला असून, यंदा तरुणांसह तरुणींचीही संख्या जास्त आहे. प्रत्येकजण वेळ काढून सरावाला येत आहे आणि ते जल्लोषात सराव करत आहेत. यंदा नवीन ठेके वादकांना शिकवले जाणार आहोत, त्याची तयारी करत आहोत. सरावातील वादनातही जोश आणि जल्लोषाची कमतरता नाही. समर्थ प्रतिष्ठानचा अथर्व कुलकर्णी म्हणाला, यंदा महाविद्यालयीन तरुणांपासून ते नोकरदार तरुणांचा नावनोंदणीस प्रतिसाद मिळाला असून, जवळपास 750 जणांनी नावनोंदणी केली आहे. रविवारपासून (दि.6) सरावाला वाद्यपूजनानंतर सुरुवात होणार असून, नावनोंदणी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या परवानगीनंतर पथकांनी बुधवारी सरावाला सुरुवात केली आहे. तर काही पथके वाद्यपूजनानंतर रविवारपासून सरावाला सुरुवात करतील. पथकांमध्ये नव्या वादकांची संख्याही मोठी आहे. सुमारे शंभर पथक सराव सुरु करतील.

– पराग ठाकूर, अध्यक्ष,
ढोल-ताशा महासंघ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT