भवानीनगर(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : ढेकळवाडी येथील रेशन दुकानाची (स्वस्त धान्य दुकान) परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष किरण मदने यांनी ढेकळवाडी येथील रुकसाना मुबारक मुलानी यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या विरोधात जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बारामती येथील पुरवठा निरीक्षक व तलाठी यांनी धाड टाकून तपासणी वेळी दुकानात व समोरील जुन्या घरात 2,890 किलो गहू 3800 किलो तांदूळ व 150 किलो साखरसाठा आढळून आला.
दुकानाचा पंचनामा करताना कोणतेही दप्तर तपासणीसाठी उपलब्ध नव्हते 14 कार्डधारकांचे जबाब घेण्यात आले, यामध्ये सहा कार्डधारकांनी ऑगस्ट 2022 मध्ये नियमाप्रमाणे धान्य दिले नसून, नियमानुसार व वेळेत धान्य मिळत नाही, अशी तक्रार केली.
बारामतीचे तहसीलदार यांच्याकडील तपासणी अहवाल व स्वस्त धान्य दुकान परवानाधारक यांनी सादर केलेला लेखी खुलासा व तक्रारदार यांचे म्हणणे याचे अवलोकन केले असता तपासणी फॉर्मनुसार व प्रत्यक्ष यामध्ये सर्व योजनेचा 427 किलो गहू कमी आढळून आला व सर्व योजनेचा मिळून 35 किलो तांदूळ जास्त आढळून आला आहे.
तसेच वजन-मापे प्रमाणपत्र अद्ययावत नसल्याचे तपासणीत दिसून आलेे. परवानाधारकांकडून शासनाने ठरवूून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी या आदेशांमध्ये नमूद केले आहे. रुकसाना मुबारक मुलानी यांच्याकडून तपासणीमध्ये कमी आढळून आलेला गहू 427 किलो व जास्त आढळून आलेला तांदूळ 35 किलो धान्याची चालू बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून शासन जमा करून घेण्यात यावी व त्यांच्या स्वस्त धान्य दुकान परवान्याची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला.
स्वस्त धान्य दुकानचालकांचा गैरकारभार रोखण्यासाठी तक्रारी दिल्या, तर त्यांच्यावर खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल होतात. पण रेशन दुकानदारांचा धान्याचा अपहार उघड झाला, तरी त्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही. परवाना रद्द करण्याबरोबरच पुरवठा विभागाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार आहोत.
– हनुमंत वीर,
अध्यक्ष, पुणे जिल्हा शेतकरी संघटना