मंचर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणार्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरकारने धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने घोडेगावच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी सकल मराठा समाजाचे बाबाजी चासकर, यादव चासकर, गणेश खानदेशे, इंद्रजित ढोले, सुरज पडवळ, राजाराम बाणखेले, आशिष घोलप, संजय चिंचपुरे, गणेश हुले, संदीप पडवळ, अशोक काळे आदी समाजबांधव उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हे एक आदर्श सरपंच होते. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यापासून ते तपास करण्यापर्यंत संथगतीने काम सुरू आहे.
एका सरपंचाची हत्या होणे, हे दुर्दैव असून, त्यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. हत्येतील गुन्हेगार व सूत्रधार मोकाट फिरत असून, बीडचा बिहार करून ठेवला आहे.
ही दहशत पसरविणार्या लोकांना व सरपंच देशमुख यांची हत्या करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी तसेच गुन्ह्याचा सूत्रधार वाल्मीक कराड याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाबाजी चासकर यांनी निवेदनात दिला आहे.