पुणे: धनकवडी परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अशोक लिंगोजी पवार (वय ४५, रा. प्रेमानंद सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पवार हे एका मेडिकल दुकानात काम करतात. २० जून रोजी दुपारी त्यांच्या भावाने फोन करून घराचे कुलूप तोडून कोणी तरी आत प्रवेश केल्याची माहिती दिली. घरी आल्यानंतर घरातील सुमारे २० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून पवार यांना आढळून आले.
घटनेनंतर पवार यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तीन संशयित चोरटे घरात प्रवेश करताना दिसून आले. तपासादरम्यान याच चोरट्यांनी शंकर महाराज मठासमोरील रॉयल ऑर्केड इमारतीच्या ई-विंगमधील तसेच साई निवास इमारतीतील सदनिकांमध्येही घरफोडी केल्याचे समोर आले आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
चोरीला गेलेली इव्ही जीपीएसद्वारे शोधली अन् मुद्देमालही मिळाला
प्रभात रस्त्यावरील उच्चभ्रू परिसरात घरफोडी करून दुचाकी आणि घरातील पितळी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे, चोरीस गेलेल्या दुचाकीचा जीपीएसच्या मदतीने शोध घेत मालकाने स्वतःच ती शोधून काढली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजीव वसंत पांडेकर (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. पांडेकर हे संगीत शिक्षक असून, प्रभात रस्त्यावरील लेन क्रमांक १ मधील परमेश्वर बंगल्यात कुटुंबासह राहतात.
२१ जून रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्याने फिर्यादींच्या घराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश केला. घरातील पितळी साहित्य, तसेच अंगणात लॉक करून उभी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी चोरून तो पसार झाला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर चोरीस गेलेल्या दुचाकीतील जीपीएस प्रणालीचा आधार घेत पांडेकर यांनी मोबाईलद्वारे शोध घेतला. त्या वेळी दुचाकी बिबवेवाडी परिसरातील एका मोकळ्या मैदानात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता चोरीस गेलेली दुचाकी, तसेच घरातून नेण्यात आलेले पितळी साहित्य आणि तांब्याचे जार तेथे आढळून आले, असे फिर्यादित नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार घाडगे करीत आहेत.