दीपक देशमुख :
सावध झालों सावध झालों ।
हरिच्या आलों जागरणा ॥1॥
तेथें वैष्णवांचे भार ।
जयजयकार गर्जतसे ॥ध—ु.॥
पळोनियां गेली झोप ।
होतें पाप आड तें ॥2॥
तुका म्हणे त्या ठाया ।
ओल छाया कृपेची ॥3॥
यवत : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. 15) रात्री आठ वाजता यवत मुक्कामी दाखल झाला असून, या वेळी यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले. यवत गावाच्या सीमेवर सदानंद दोरगे, कुंडलिक खुटवड, इम्रान तांबोळी, गौरव दोरगे, चंद्रकांत दोरगे, नाना दोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. यवतमधील काळभैरवनाथ मंदिरात पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर दिंडी प्रमुखांची हजेरी आणि समाज आरती होऊन तुकोबारायांच्या पादुका दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा उरुळी कांचन येथे विसाव्यासाठी थांबला होता. त्यानंतर पालखी महामार्गावरील दौंड तालुक्यातील पहिले गाव बोरीभडकच्या वतीने हवेली आणि दौंडच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात दौंडचे नागरिक तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित होते. बोरीभडक ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य मंडप पालखी मार्गावर उभारण्यात आला होता, तसेच पालखी दौंडच्या हद्दीत दाखल होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळा खामगाव, कासुर्डी, सहजपूर असा मजल-दरमजल करीत यवत मुक्कामी दाखल झाला.
दौंड आणि हवेली तालुक्याच्या सीमेवर पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, बोरीभडकचे सरपंच कविता कोळपे, उपसरपंच प्रवीण खेडेकर, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, नितीन दोरगे, गणेश जगदाळे, माउली ताकवणे, धनाजी शेळके आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते, तर प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, भाऊसाहेब पाटील, अविनाश शिळीमकर, उल्हास कदम, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदी
उपस्थित होते.
चोख पोलिस बंदोबस्त
पालखी मार्गावर वारकरी भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अवजड वाहनांना पालखी मार्गावर बंदी करण्यात आली होती. त्यामुळे वारकर्यांना सहज पालखी मार्गावरून जाता येत होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त असल्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.