Devendra Fdnavis On Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत ज्या ठिकाणी महायुती एकमेकाविरोधात लढत आहे तिथं एकमेकांवर टीका न करण्याचं ठरवलं होतं. मात्र अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना भाजपवर टोकाची टीका केली होती. इतके दिवस संयम बाळगलेल्या फडणवीस यांनी अखेर अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. "घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? किमान विश्वास बसेल असा तरी जाहीरनामा द्या," अशा शब्दांत फडणवीसांनी अजितदादांच्या मोफत प्रवास आणि मेट्रोच्या आश्वासनांचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी गुन्हेगारांना तिकीट देण्यावरूनही अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण वेगवेगळे लढत असताना 'मैत्रीपूर्ण लढत' देऊ आणि एकमेकांवर टीका टाळू, असा शब्द दिला होता. "मी आजवर संयम पाळला, पण निवडणुकीची परिस्थिती पाहून अजितदादांचा संयम आता ढासळलेला दिसतोय. ते आता बोलत आहेत, पण १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत," असा टोला फडणवीसांनी लगावला. अजित पवारांच्या 'माझं काम बोलतं' या विधानावरही त्यांनी खोचक टिप्पणी केली.
अजित पवारांनी महिलांना बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते. त्यावर फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले, "मी सुद्धा आता अशी घोषणा करू शकतो की, पुण्याहून उडणाऱ्या विमानांत महिलांना तिकीट माफ असेल. अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं? पण लोकांना माहिती आहे की, हे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा आपण निवडून येणार नाही हे ठाऊक असतं, तेव्हाच असे जाहीरनामे काढले जातात."
पुण्यातील गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरूनही फडणवीसांनी अजितदादांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ६० लाख पुणेकर असताना गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची गरज काय? "एकडे कोयता गँग संपवण्याची आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईची भाषणे द्यायची आणि दुसरीकडे त्याच गुन्हेगारांना तिकीट देऊन त्यांचे समर्थन करायचे, हे अत्यंत चुकीचे आहे. लक्षात ठेवा, हे गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महानगरपालिका नसेल, तर ती जेलच असेल," असा कडक इशारा फडणवीसांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्या या सडेतोड टीकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीमधील 'मैत्रीपूर्ण' लढत आता संघर्षात बदलल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.