तुम्ही राहुल कुल यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करून पाठवा, मी त्यांना मंत्री करून पाठवतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड (ता. दौंड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या सांगता सभेदरम्यान सांगितले. वरवंडच्या बाजार मैदानात झालेल्या या जंगी सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या वेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यास सर्वच शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार असून, या वेळी त्यांनी राहुल कुल 24 तास काम करणारे नेतृत्व असून, त्यांच्या कार्याला माझा सलाम असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, जलसंधारणाबाबत राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षांत मोलाचे काम केले असून, राहुल कुल यांनी स्वतःचा जलसंधारण पॅटर्न तयार केला आहे. आ. राहुल कुल यांनी सांगता सभेचा विक्रम मोडला असून, येणार्या काळात आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आपला आशीर्वाद हा मोलाचा असून, या तालुक्याचे स्वप्न पूर्ण करणारा आहे.
काय म्हणाले राहुल कुल?
या वेळी महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल म्हणाले की, या सभेने गर्दीचा विक्रम मोडला आहे, त्यामुळे मतदारांचे मनापासून धन्यवाद. समोरच्या उमेदवाराकडे विकासकामाबाबत कसलाही मुद्दा राहिलेला नाही. ते केवळ टीका करण्यावर भर देत आहेत.
मी केलेल्या विकासकामांच्या चर्चेचे आव्हान त्यांनी धुडकावून लावले आहे, त्यामुळे त्यांना तालुक्याचे काहीही देणेघेणे नाही, हे दिसून आले आहे. ज्या भीमा- पाटस कारखान्याबाबत ते टीका करतात, तो कारखाना सुरू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांचे त्यांनी स्वतःच कारखान्याच्या सभेत कौतुक केले आहे आणि आता टीका करत आहेत. यावरून त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला असून, गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.
ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन तालुक्याचा विकास केला आहे. पाण्याबाबतीत अभ्यासपूर्ण काम मागील 10 वर्षांत करण्यात आले. 410 कोटींचा वाघोली-राहू रस्ता तयार करण्यात आला. अनेक योजना आज प्रगतिपथावर आहेत.
200 कोटी रुपयांचा टेक्नॉलॉजी प्रकल्प एमआयडीसीमध्ये उभा करण्यात येणार आहे. अनेक मागण्या प्रलंबित आहेत. 80 टक्के सुपीक असलेला तालुका आहे. पुढच्या काळात आमच्या मागे उभे राहा. मुळशी धरणाचे पाणी दौंड तालुक्यात आणणार आहे, पाण्याचे व्हिजन घेऊन मी निवडणुकीत उतरलो आहे. महायुतीमधील सर्व घटकपक्ष माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. उद्याचे येणारे सरकर महायुतीचे असून, आम्ही सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहणार आहोत.
योगेश टिळेकर काय म्हणाले?
आ. योगेश टिळेकर म्हणाले, काम करण्याची इच्छाशक्ती असलेले नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदार राहुल कुल यांच्या पाठीशी उभे राहावे. माजी आमदार रंजना कुल यांचा देखील दौंडच्या विकासात मोलाचा वाटा आहे. आ. राहुल कुल यांनी सातत्याने विधानसभेत प्रश्न मांडून मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र काम केले आहे. आ. राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. आगामी काळात त्यांना मंत्री या रूपाने आपल्याला पाहायचे आहे.
फडणवीस यांच्याकडून दौंडला ‘गिफ्ट’
महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी मागणी केलेल्या मुळशीचे पाणी, दौंडला नवीन एमआयडीसी तसेच तालुक्यासाठी दर्जेदार शैक्षणिक संकुल देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुलींचा मामा मंत्रालयात बसला आहे
मुली हुशार असूनदेखील पैशाच्या अभावामुळे शिक्षण अपुरे राहू नये म्हणून आमच्या सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली असून, त्यांचा मामा हा मंत्रालयात बसला असल्याने मुलींनी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.