Devendra Fadanvis News: विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या, मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवारी (दि. 2) पुण्यात दाखल होत आहेत. या दौर्यात ते नाराज नेत्यांशी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारामध्ये सहभागी होण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये शहरातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. मात्र, पक्षाने विद्यमान आमदारांवरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांचा हिरमुड झाला आहे.
भाजपमध्ये बंडखोरी झालेली नसली, तरी इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने अद्यापही नाराज आहेत. कसबा मतदारसंघामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक होते, याशिवाय पर्वतीमधून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कोथरूडमधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि शिवाजीनगरमध्ये माजी नगरसेवक सनी निम्हन इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने हे सर्व नाराज आहेत.
दुसरीकडे वडगाव शेरी हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीची तयारी करणारे माजी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे नाराज आहेत.
बालवडकर, घाटे, भिमाले यांची नाराजी दूर करण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व शहरातील नेत्यांना काहीसे यश आले आहे. मात्र, इच्छुकांच्या नाराजीचा फटका महायुतीला किंवा भाजप उमेदवारांना बसू नये, यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात येत आहेत. ते सर्व नाराज इच्छुकांशी व्यक्तिगत स्वरूपात संवाध साधणार आहेत. त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारामध्ये सक्रिय होण्याच्या सूचना करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.