Devendra Fadnavis reaction Ajit Pawar death
मुंबई : "अजित पवार हे लोकनेते होते. आम्ही अत्यंत जवळून आणि संघर्षाच्या काळात एकत्र काम केले आहे. त्यांचे निधन झाले, यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला आणि राज्यातील प्रश्नांची जाण असलेला ते एक नेते होते. अजितदादा हे संघर्षशील नेतृत्व होतं. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे ते व्यक्तिमत्व होते. आजचा दिवस राज्यासाठी कठीण आहे, कारण अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. अशा काळात त्यांचे अचानक निघून जाणे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी तर एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
"पवार कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. आम्ही लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील," असेही फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्यात शासकीय सुट्टी घोषीत केली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.