पुणे : राज्यातील लाखो शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत रविवारी दिले. राज्य सरकारची कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकर्यांना थेट लाभ देण्यासाठी प्रशासनिक हालचाली वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पुणे अॅग्रो हॅकॅथॉन’च्या समारोप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे राज्यभरातून कर्जमाफीची मागणी तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुण उद्योजक घडले आहेत. कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियाही सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार सुरू असून सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करत आहे.