पुणे

पुणे विभागातील 16 स्थानकांचा ‘अमृत भारत’अंतर्गत विकास

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमृत भारत रेल्वे योजनेंतर्गत रेल्वेच्या पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात विभागातील तळेगाव, कोल्हापूर, आकुर्डी या तीन स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.6) त्याचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अमृत भारत योजनेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे यांनी ही माहिती दिली.

या वेळी रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार, विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला उपस्थित होते. या वेळी दुबे यांनी प्रवासी संघटनांना या पुनर्विकास होणार्‍या स्थानकांबाबत काही सूचना असल्यास आम्हाला कळवाव्यात, असे आवाहन केले.

त्या म्हणाल्या, 'रविवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी पुनर्विकास होणार्‍या स्थानकांवरदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या वेळी अमृत भारत योजनेत सहभागी होऊन चित्रकला स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.'

…तर दुचाकी पार्सल करणारा ठेकेदार 'टर्मिनेट'

पुणे रेल्वे स्थानकावर दुचाकी पार्सल करताना अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या पाहाणीतदेखील हे सिध्द झाले आहे. मात्र, हा प्रकार सातत्याने सुरूच असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे प्रकार तातडीने थांबवा अन्यथा संबंधित ठेकेदाराला टर्मिनेट केले जाईल, असा कडक इशारा विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे यांनी या वेळी दिला.

हेहा वाचा

SCROLL FOR NEXT