नवी सांगवी : जुनी सांगवी येथील मजूर अड्डा चौकात सुशोभीकरण करण्यात आलेल्या बेट सभोवताली पोती, कपडे, मद्याच्या बाटल्या, पिशव्या आदी साहित्य पसरवून ठेवल्याने चौकातील सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. महापालिकेच्या संबंधित आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
लाखो रुपये गेले वाया
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महापालिकेच्यावतीने लाखो रुपये खर्च करून चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मध्यभागी बेट उभारण्यात आले आहे. यावर भारतीय संविधानाची प्रस्तावना साकारण्यात आली आहे. तसेच, याभोवती नगारा, तुतारी, तबला, पेटी यासारखे वाद्यांचे शिल्प ठेवण्यात आली आहेत. वाहनचालक, पायी चालणार्या नागरिकांचे हे बेट लक्ष वेधून घेत आहेत.
कारवाईची नागरिकांची मागणी
येथून ये-जा करणार्या वाहनचालकांना, पायी चालणार्या नागरिकांना या कचरा दिसत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील स्वच्छता करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
सीसीटीव्ही बसवा
महापालिका प्रशासनाने शहरात सौंदर्य, संविधानाची आठवण व त्याची जाणीव नागरिकांना होण्यासाठी जुनी सांगवी येथील माकन चौकामध्ये संविधान चौक म्हणून विकसित केला आहे. परंतु, याची महापालिकेच्या प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अवहेलना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिल्पाच्याखाली सकाळी आठ वाजल्यापासून कचरा पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे व संबंधित अधिकार्यांचे तसेच लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सीआर सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष शशिकांत निकाळजे यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचार्यांचे दुर्लक्ष
मागील काही दिवसांपासून बेट परिसरात भंगार अवस्थेतील साहित्य गोळा केलेले पोती, कपडे, मद्याच्या बाटल्या, पिशव्या आदी साहित्य पसरवून ठेवलेले दिसत आहे. हाकेच्या अंतरावर आरोग्य विभाग तर काही अंतरावर कचरा निर्मूलन संकलन केंद्र आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कचर्याच्या घंटा गाड्या दिवसभरात येथील चौकातील बेट परिसरातील कचरा पाहूनदेखील न पाहिल्यासारखे ये-जा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.