भोर; पुढारी वृत्तसेवा: जलजीवन मिशन योजनेमुळे तालुका टँकरमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. योजनेबरोबर सौरऊर्जेचा
नव्याने आराखडा तयार करावा. त्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना भविष्यात वीजबिलातून मुक्ती मिळेल, असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. भोर तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि. 28) आमदार थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय व पुनर्विलोकन समितीची आढावा बैठक पार पडली. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, माजी उपसभापती रोहन बाठे, नायब तहसीलदार मनोहर पाटील, अजिनाथ गाजरे, गटविकास अधिकारी स्नेहा देव, पाणीपुरवठा अधिकारी जे. एस. ताकवले, बांधकाम अधिकारी संजय वागज, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जे अधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, त्याचे कारण लेखी स्वरूपात कळवावे; अन्यथा माझ्या पध्दतीने त्यांच्यावर कारवाई करेन. तसेच अनेक शिक्षक कर्मचार्यांची पदे रिक्त असून, ऑनलाइन पध्दतीने बदल्या होत असताना ज्या ठिकाणच्या शिक्षकांची बदली झाली; परंतु जोपर्यंत त्या ठिकाणी नवीन शिक्षक रुजू होत नाही तोपर्यंत तालुक्यातील जिल्हा आऊटचे पत्र देऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले.
पीएमआरडीएचे कार्यालय क्षेत्रीय कार्यालयात उभारावे. भूमिअभिलेखमध्ये अनेक शासकीय जागेत अतिक्रमण होत असताना त्यांची मोजणी करून ग्रामपंचायतदफ्तरी नोंद करून घ्यावी आदी सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या. तीन महिन्यांनी समन्वय व पुनर्विलोकन समितीची आढावा बैठक होणार असून, प्रत्येक विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित राहून कामाचा अहवाल देणे बंधनकारक राहणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
मुर्टीत तब्बल 127 मिलिमीटर पाऊस
नदी, नाले तुडुंब : यंदा पावसाने चांगला जोर दिल्याने सुरुवातीला आनंद वाटत होता. परंतु आता पावसाने उघडीप द्यावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर दिवसभर कोसळणार्या पावसामुळे व्यापारी चिंता व्यक्त करत आहेत. पावसाने उघडीप दिल्याशिवाय बाजारपेठेत खरेदीला वेग येणार नाही. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्यातून वाहणारी निरा व कर्हा नदी तुडुंब भरून वाहत आहे. याशिवाय सर्वच ठिकाणी ओढे, नाले, चार्याही पावसाने भरून वाहत आहेत.
बुधवारी सकाळ 24 तासांपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटर)
बारामती- 18, उंडवडी कडेपठार-20, सुपा-110, लोणी भापकर-79, माळेगाव कॉलनी-15, वडगाव निंबाळकर-118, पणदरे-18, मोरगाव-67, लाटे-20, बर्हाणपूर-21, सोमेश्वर कारखाना 40, जळगाव कडेपठार-25, होळ आठ फाटा- 50, माळेगाव कारखाना-5, मानाजीनगर-20, चांदगुडेवाडी-51, काटेवाडी- 9, अंजनगाव-13, जळगाव सुपे-25, केव्हीके-10, सोनगाव-2, कटफळ-45, सायंबाचीवाडी-55, चौधरवाडी-55, नारोळी-35, कार्हाटी-13, गाडीखेल-20, जराडवाडी-25, पळशी-50, सावंतवाडी-17, मुर्टी-127, मोढवे-94.