पुणे

उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांची पाठराखण करतात : खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

अमृता चौगुले

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल शिवछत्रपतींचा अवमान करतात तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची पाठराखण करत असल्याचे दुर्दैव असल्याची टीका बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभप्रसंगी सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नव्हता.

मात्र 'ईडी' सरकारच्या काळात दिल्लीच्या इशार्‍यावर राज्यकारभार सुरू आहे. इकडे राज्यपाल महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व नंतर छत्रपती शिवरायांवर खालच्या भाषेत अवमानकारक वक्तव्य करत असताना त्यांची पाठराखण केली जातेय आणि विरोधी बाकावरील कोणी काही विरोधात बोलले तर त्यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येत आहे. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, महावितरण विभागाने शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता वीज जोड तोडले आहेत.

शेतकर्‍यांकडे वीजबिल भरण्यासाठी पैसे नाहीत. इंदापूर तालुक्यातील विरोधकांच्या कारखान्यांनी शेतकर्‍यांचे उसाचे पैसे दिले नसल्याने कुठून पैसे भरायचे ? त्यामुळे तातडीने शेतकर्‍यांची वीज जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आपण तीव्र आंदोलन उभारणार आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच येथील विरोधकांनी वीजबिल माफीसाठी वीज बोर्डात झोपायला जाऊन आंदोलन केले होते. आणि आता तेच विरोधक शेतकर्‍यांना किमान एक तरी बिल भरावे लागेल असे सांगत आहेत. त्यामुळे अशा दुटप्पी व ढोंगी विरोधकांनी आता शेतकर्‍यांवर असलेले प्रेम वीजबिल माफी देऊन सिद्ध करावे.

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, प्रतापराव पाटील, प्रशांत पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, अमोल पाटील, अभिजित रणवरे, लक्ष्मणराव शिंगाडे, विरसिंह रणसिंग, नंदकुमार रणवरे, सागर मिसाळ, रामभाऊ रणसिंग, विनोद रणसिंग, पप्पू रणवरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच धैर्यशील रणवरे यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश धापटे यांनी केले.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर मोफत वीज द्या
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या वीजतोडणी मोहिमेवर बोलताना सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी बाकावर असलेले फडणवीस यांनी मध्य प्रदेशचा दाखला देत शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याची मागणी केली होती. तेंव्हा कोरोना असल्याने राज्याचे उत्पन्न घटल्याने ते शक्य नव्हते. आता स्वतः फडणवीस सत्तेत आहेत आणि सध्याचे राज्याचे उत्पन्नही भरघोस आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील शेतकर्‍यांना मोफत वीज द्यावी, अशी माझी विनम— विनंती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT