पुणे: हवामान विभागाने भारतातील लोकांना विज्ञान साक्षर केले. एक वेळ अशी होती की, केवळ 10 टक्के शेतकरी या विभागाचे अलर्ट पाहात असत. मात्र, आता मोबाईलवर अलर्ट येत असल्याने 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे अलर्ट पाहतात, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर येथील आयएमडीच्या मुख्यालयात पंतप्रधानांचे भाषण दिल्लीवरून थेट प्रसारण स्वरूपात दाखविण्यात आले.
भारतीय हवामान विभागाची स्थापना 1875 मध्ये झाली. ते कार्यालय सिमला येथे स्थापन झाले. मात्र, 1928 ते 1945 पर्यंत पुणे शहरात होते. नंतर दिल्ली येथे मुख्यालय गेले. या प्रवासाला 15 जानेवारी रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली मुख्यालयातून देशातील सर्व शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील कार्यालयाचे प्रमुख डॉ. कृपाण घोष यांच्या नेतृत्वाखाली सर्वच शास्त्रज्ञांनी हे प्रसारण पाहिले. तसेच, माजी कर्मचार्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. पंतप्रधान मोदी यांनी भाषणात भारतीय हवामान विभागाची प्रगती सांगत देशभरातील सर्वच हवामान शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
ते म्हणाले, गत दीडशे वर्षांत या विभागाने सामान्य नागरिकांना विज्ञान साक्षर केले. लोकांना हवामानाचे अंदाज हळूहळू समजू लागले.आपल्या देशात पूर्वी शेकडो बळी चक्रीवादळांनी घेतले. मात्र, अलीकडच्या काळात ते प्रमाण खूप कमी झाले आहे. कारण सरकारने या विभागाला मोठी यंत्रणा उपलब्ध करून दिली.
आज हवामान विभागात दिवसभर प्रदर्शन
15 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत शिवाजीनगर येथील मुख्यालयात हवामानविषयक उपकरणांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. त्यात शालेय विद्यार्थी जिज्ञासूंना प्रवेश खुला आहे, अशी माहिती या विभागाचे प्रभारीप्रमुख डॉ. कृपाण घोष यांनी दिली.