पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची क्रमवारीत भरारी

अमृता चौगुले
पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या क्यू एस वर्ल्ड रँकिंगमध्ये आजवर अनेक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.  आता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागानेही मागील वर्षीच्या तुलनेत भरीव कामगिरी केली आहे. रसायनशास्त्र विभागाला यंदा 501 ते 550 च्या गटात स्थान मिळाले आहे. मागील वर्षी हा विभाग 551 ते 600 च्या गटात होता. आंतरराष्ट्रीय रँकिंग एजन्सी क्वाक्वेरेली सायमांडस (क्यूएस) ही जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी ठरवते. नुकतीच या एजन्सीने 2022 या वर्षाची विषयानुसार क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीत विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाला मागील वर्षाच्या तुलनेत 50 ने अलीकडचे स्थान मिळाले आहे. एकूण 1 हजार 543 विद्यापीठ आणि संस्था वेगवेगळ्या 51 विषयांमध्ये या क्रमवारीत आहेत. त्यातून रसायनशास्त्र विभाग 501 ते 550 च्या गटात आहे. रसायनशास्त्र विषयात भारतात विद्यापीठ 14 व्या स्थानावर असून, आधीच्या स्थानांवर आयआयटी व आयएएस सारख्या संस्था आहेत. विशेष म्हणजे, राज्य विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. या क्यूएस क्रमवारीत विद्यापीठांचे मूल्यांकन तेथील संशोधने, प्राध्यापकवर्ग, आंतरराष्ट्रीय पोहोच, शैक्षणिक कामगिरी आदींच्या माध्यमातून ठरवली जाते.
जागतिक स्तरावर विद्यापीठ सातत्याने स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. रसायनशास्त्र विभागाने केलेली कामगिरी अभिमानास्पद असून, मला खात्री आहे की, भविष्यात अन्य विभागही अशाच प्रकारे विद्यापीठासाठी भरीव योगदान देतील.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
हेही वाचा:
SCROLL FOR NEXT