पुणे

राजगुरूनगर : भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी

अमृता चौगुले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : चासकमान धरणाच्या खालील भागात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून धरणातून पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी आणि शेतक-यांनी केली आहे. रब्बी हंगामातील पिकांना सिंचनाची गरज आहे. मात्र, अशा कालावधीत भीमा नदीच्या पात्रात पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. भीमा नदीपात्रात पाणी सोडून नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यावर ढापे बसवावेत, असेही शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाला सुचविले आहे.

भीमा नदीतील पाण्याने तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून पाणी उचलण्यासाठी शेतक-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जंगली जनावरांचा वावर असताना शेतात रात्रीचा दिवस करावा लागत आहे. अशातच वीजपंपाच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शेतकरी वर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

चासकमान धरणातून डाव्या कालव्यात कमी क्षमतेने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या आवर्तनाबरोबरच नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतक-यानी आणि विविध गावच्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी केली आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आजच पाणी सोडण्यात आले आहे. रब्बी हंगामात गरज आहे तेवढे व त्यानंतर टंचाई जाणवेल, अशा काळात धरणातील पाणी सोडण्यात येईल, असे आ. मोहिीते पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT