पुणे

आम्हालाही रोख मोबदला द्या; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जागा मालकांची मागणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनाच्या कचाट्यात अडकलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची विघ्ने संपण्याचे नाव घेत नाही. रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेत एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) आणि टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) पोटी जागा देण्यास तयार झालेल्या जागामालकांनी आता रोख मोबदल्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध असलेल्या जागेवर वापरण्यायोग्य रस्ता करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आवश्यक भूसंपादन झालेले नसतानाही निविदा प्रक्रिया राबवून विधानसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्यात आले. चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी साडेचार वर्षांपासून भूसंपादनाचे घोंगडे भिजत पडले आहे. आत्तापर्यंत अवघे 1 किलो मीटर लांबीचे काम तेही टप्प्याटप्प्यामध्ये झाले आहे. दरम्यान, यावर मार्ग काढण्यासाठी रस्त्याची रुंदी 84 वरून 40 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 277 कोटी आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटींची मागणी केली आहे.

काही जागामालक यापूर्वी एफएसआय आणि टीडीआरच्या मोबदल्यात जागा देण्यास तयार होते. मात्र, मागील अनेक वर्षे ही प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण करण्यात आली नाही. आता हेच जागामालक जागेचा मोबदला रोख स्वरुपात मागत आहेत. त्यामुळे महापालिकेसमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळे महापालिकेने आता ताब्यात असलेल्या व उपलब्ध असलेल्या जागेवरच वापरण्योग्य रस्ता करण्याचा व त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम करताना रस्त्यावरील काही पोल स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या कामासाठी साडेचार कोटी रुपयाची निविदा पावसाळ्यापूर्वीच मंजूर करण्यात आली असून, राजस सोसायटी ते शत्रुंजय मंदिरदरम्यान रस्ता करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी केली पाहणी
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, भूमी जिंदगीचे उपायुक्त अजित देशमुख यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

SCROLL FOR NEXT