पुणे : थंडीस सुरवात झाल्याने बाजारात पपईला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. बाजारात पपईची आवकही चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत लिंबांची आवक 1 हजार गोण्यांनी घटल्याने रविवारी लिंबांच्या 15 किलोंच्या गोणीमागे 50 रुपयांनी वाढ झाली. खरबुजाचा नवीन हंगाम सुरू झाला असून बाजारात कमी प्रमाणात खरबूज उपलब्ध असल्याने त्याच्याही दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
बाजारात पेरूची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, थंडीमुळे त्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने पेरूच्या भावात 20 किलोंमागे 100 रुपयांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक जावक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम असल्याने त्यांचे भावही टिकून आहेत. येत्या गुररुवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. या काळात अन्य फळांची आवक वाढून त्यांना मागणीही वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी (दि. 20) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 5 ट्रक, संत्री 20 ते 25 टन, मोसंबी 30 ते 40 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबे सुमारे 1 हजार 500 ते 2 हजार गोणी, पेरू 1200 ते 1500 के्रटस्, कलिंगड 4 ते 5 गाड्या, खरबूज 6 ते 7 गाड्या, सफरचंद 7 ते 8 हजार पेटी, बोरे 350 ते 400 पोती तर सिताफळाची 60 ते 70 टन आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 200-400, अननस : 100-450, मोसंबी : (3 डझन) : 250-500, (4 डझन) : 150-250, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 80-250, गणेश : 20-60, आरक्ता 30-80. कलिंगड : 15-25, खरबूज : 20-35, पपई : 5-25, पेरू (20 किलो) : 200-300, चिक्कू (10 किलो) : 100-500 सिताफळ : 20-70, बोरे (10 किलो) : 120-900.