खासदार सुप्रिया सुळे Pudhari
पुणे

हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमध्ये जावे : खासदार सुप्रिया सुळे

Supriya sule : गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील बापदेव घाटात परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहखात्यावर ताशेरे ओढत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणतात, राज्यात कायद्याचे राज्य जवळपास नाही आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे.

राज्यातील पोरी बाळींवर सामूहिक बलात्कार होत असेल तर गृहखाते सांभाळणारे गृहमंत्री काय करत आहेत? त्यांचा पोलिसखात्यावर पुरेसा धाक राहिला नाही का ? अशा घटनांनी पुण्याची असलेली सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख पुसली जाऊन क्राइम कॅपिटल इतकीच ओळख उरेल. पुण्यात अलीकडे ड्रग्स, कोयता गॅंग, गँगरेप सारख्या घटना सर्रास घडत आहेत. मला गृहमंत्र्याना एक प्रश्न विचारावा वाटतो, पक्ष फोडायला त्यांची यंत्रणा चालते, महिलांवरील अत्याचार थांबवायला त्यांची यंत्रणा का चालत नाही?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात बंदूक घेऊन मतासाठी पोस्टर बाजी करणे, चुकीचे आहे. त्यांना असे करायचे असेल तर बॉलीवूड मध्ये जावे, गृहमंत्री म्हणून असे चालणार नाही. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरमध्ये प्रत्येकी अशी एक घटना घडली आहे, याला सरकार जबाबदार आहे

 हा महाराष्ट्र साठी काळा दिवस

आमदार नरहरी झिरवळांनी आज आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्रालयातून जाळीवर उडया मारल्या. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणतात, ' झिरवळ साहेब डेप्युटी स्पीकर आहेत. असे त्यांना वाटणे म्हणजे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. सत्तेतील आमदाराला पक्ष सोडण्याची वेळ येते म्हणजे सत्ता जाण्याची, सरकार जाण्याची वेळ आली आहे. झिरवळ साहेबांना मुख्यमंत्री यांना भेटायला वेळ घ्यावी लागते, ते उपसभापती पदावर आहेत. त्यांना वेळ मिळत नसल्याने जीवला धोका होईल अशी कृती करावी लागत आहे. सत्तेतील आमदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही भयानक गोष्ट आहे.

हर्षवर्धन पाटील आणि आमच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध 

हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली. यावर पत्रकारांनी विचारल्या असता सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. आमच्यात यापूर्वी झालेले संघर्ष राजकीय होते. कधीही कटूता आलेली नाही, हर्षवर्धन पाटील आमच्याकडे आल्यावर तर म्हणाले आता मला चांगली झोप लागतेय. पवार साहेबांवर विश्वास ठेवून आलेल्या प्रत्येकाचा मानसन्मान होईल, संघर्षाच्या काळात आमच्या सोबत जे राहिले त्यांचा मानसन्मान होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT