पुणे

पुणे : घरगुती फराळाला मागणी; महिला व्यावसायिकांना मिळतोय प्रतिसाद

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: घरगुती व्यवसाय करणार्‍या महिलांकडून बनविलेल्या तयार फराळाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी असून, महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या चिवडा, चकली, शेव, करंजी, लाडू अशा फराळाला चांगला प्रतिसाद आहे. त्यांच्याकडे फराळासाठीची ऑर्डर यायलाही सुरुवात झाली असून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसह दूरध्वनीद्वारेही ऑर्डर घेतल्या जात आहेत. याशिवाय काही व्यावसायिकांकडून घरपोच फराळ पोहचविण्याची सोयही करण्यात आली आहे.

महिला व्यावसायिकांसह त्यांचे कुटुंबीय आणि महिला कर्मचारीही त्यांना फराळ बनविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी अनारसे, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळे अशा घरगुती फराळाला मोठी मागणी आहे. खास करून नोकरदार महिलांकडून दिवाळीपूर्वीच फराळ मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. फराळ तयार करण्याचा घरगुती व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी याद्वारे रोजगार निर्माण झाला असून, घरगुती चव, कमी तेलात वापरून केलेले जिन्नस आणि स्वच्छता, या कारणास्तव घरगुती फराळाला चांगली मागणी आहे.

असे असले तरी फराळाच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या पदार्थांची 50 टक्के बाजारपेठ हे घरगुती व्यवसाय करणार्‍या महिलांच्या पदार्थांनी व्यापल्याचे दिसून येत आहे. सध्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी महिला व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. साधारणपणे एक किलोपुढील फराळ खरेदी केला जात आहे. साधारणपणे 350 रुपयांच्या पुढे या फराळाची किंमत आहे. हा व्यवसाय करणार्‍या गायत्री पटवर्धन म्हणाल्या, 'यंदा फराळासाठी ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात केली. चकली, शंकरपाळे, शेव अशा फराळाला मागणी आहे. गणेशोत्सवादरम्यान आम्ही फराळाची तयारी सुरू केली. आता दिवाळीसाठी फराळाची ऑर्डर घेत आहोत आणि मागणीप्रमाणे फराळ लोकांना दिला जात आहे. प्रत्यक्ष विक्रीसाठीसह व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह दूरध्वनीद्वारे आम्ही ऑर्डर घेत आहोत. यंदा फराळाच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. फराळासाठी खास पॅकेजिंगही आम्ही करीत आहोत.

सोशल मीडिया प्रभावी माध्यम
सोशल मीडियाद्वारे महिला व्यावसायिक फराळ विक्रीची प्रसिद्धी करीत असून, त्यासाठी खास फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज तयार करण्यात आले आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारेही ऑर्डर घेतल्या जात आहेत. व्यावसायिकांसाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत असून, अनेक ऑर्डर याद्वारे येत आहेत.

आत्ताच्या घडीला हळूहळू फराळासाठी ऑर्डर येत आहेत. आम्ही घरपोच फराळाची ऑर्डरही घेत आहोत. साधारणपणे 350 ते 900 रुपयांपर्यंत फराळ विकला जात आहे. आम्ही दसर्‍यापासून फराळ तयार करायला सुरुवात केली. साजूक तुपातला रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, सुक्या नारळाची करंजी, ओल्या नारळाच्या करंजीलाही मागणी आहे. आम्ही सोशल मीडियाद्वारे ऑर्डर घेत आहोत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑर्डर घेण्यात येत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे.

                                                        – चैत्राली नवरे, व्यावसायिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT