चाकण; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यातील औद्योगिकीकरण व नागरीकरण विचारात घेता नागरिकांना गतिमान प्रशासन लाभण्यासाठी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करावे. सध्या खेड तहसील कार्यालयांतर्गत सुमारे 190 गावे आहेत. त्यांचे विभाजन करून अप्पर तहसीलदारांचे पद चाकण येथे निर्माण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आदिवासी, दुष्काळी, बागायती, नागरी, औद्योगिक क्षेत्र खेड तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात आहे.
राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी, पार्किंग प्रश्न, अपघात यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकदा इच्छा असूनही तहसीलदार सर्वच कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून कामाचा निपटारा करू शकत नाही. प्रशासकीय विभाजन झाल्यास विद्यमान तहसीलदारांकडे 117 गावे व अप्पर तहसीलदार चाकण पदनिर्मिती करून त्यांच्याकडे 73 गावे व या 73 गावांबाबत अन्य भूमिअभिलेख व पुरवठा विभाग प्रशासकीय विभाजन करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यास चाकण पंचक्रोशीतील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. सदर 73 गावे औद्योगिक व नागरी क्षेत्रात असून, त्यांना चाकण शहर प्रशासकीय दृष्ट्या जवळ व सुलभ आहे.
हवेली तालुका प्रशासकीय विभाजन ज्याप्रमाणे झाले, त्याच धर्तीवर खेड तालुक्यातील प्रशासकीय विभाजन करून अपर तहसीलदार, चाकण पदनिर्मिती करून त्यांच्याकडे चाकण, पिंपळगाव, आळंदी, पाईटसह राजगुरिनगर मंडलपैकी प्रशासकीय व भौगोलिक परिस्थिती विचार करता वाकी बुद्रुक सजा अंतर्गत एकूण 73 महसुली गावे वर्ग करून त्या क्षेत्रासाठी उपअधीक्षक, खेड व पुरवठा विभाग देखील विभाजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. चाकण येथील मध्यवर्ती ठिकाणी गट नंबर 2493 या जागेत चाकण नगरपरिषद, अप्पर तहसीलदार, अतिरिक्त मुख्यालय सहायक, भूमिअभिलेख चाकण (खेड), पुरवठा विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यलय होऊ शकते.
अप्पर तहसीलदार चाकण यांच्याकडे वर्ग सर्व महसुली गावे पीएमआरडीए क्षेत्रात असून, शहरी भागासाठी असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यकक्षेत ही गावे समाविष्ट करावीत व स्वतंत्र परिमंडल अधिकारी ( नायब तहसीलदार संवर्ग) हे पद निर्माण करावे, दुय्यम निबंधक खेड 2 (चाकण), पोस्ट ऑफिस, महावितरण, पोलिस स्टेशन, चाकण ही कार्यालये एकाच जागी घेऊन प्रशासकीय इमारत बांधकाम होऊ शकते, असे खेड बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. नीलेश कड पाटील, चाकण शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, चाकण सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, उपाध्यक्ष दत्ता गोरे, वाकी खु. सोसायटीचे अध्यक्ष नितीन जाधव आदींनी सांगितले आहे.