खोडद, पुढारी वृत्तसेवा: नगदवाडी (ता. जुन्नर) हे गाव उंचावर असून या भागात पाण्याचे स्रोत कमी आहेत. मीना सिंचन कालवा हा शेतकर्यांसाठी आधार असून या चारीची झालेली अवस्था पाहता त्याची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मीना सिंचनचे पाणी शिंदेमळ्यापर्यंत पूर्ण दाबाने कसे मिळेल यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती माजी जि. प. सदस्य पांडुरंग पवार यांनी दिली.
मीना सिंचन कालव्याची पोटचारी क्रमांक 1 मधून वडगाव कांदळी, नगदवाडी, कांदळी या गावांना सिंचनासाठी कालवा काढण्यात आला. परंतु, त्याचा फायदा नगदवाडी, कांदळी या गावांना होत नाही. चारीत गाळ, झाडे वाढल्याने नगदवाडी परिसराला कमी पाणी मिळते. शिंदे मळा, कांदळी औद्योगिक वसाहतीपर्यंत ही चारी असून या ठिकाणी पाणी कधीही गेलेले नाही. या परिसराला कुकडी नदी किंवा येडगाव धरण जलाशय या ठिकाणाहून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी मिळते. परंतु याद्वारे ओलिताखाली आलेली जमीन अतिशय कमी आहे. परिसरातील लोकांना मीना सिंचन कालव्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी नगदवाडी ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी कुकडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी रवींद्र हांडे यांची ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
नगदवाडी परिसराला पाणी देण्यासाठी येत्या आठ दिवसात सर्वेक्षण केले जाईल, असे कुकडी पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हांडे यांनी सांगितले. यावेळी कांदळीचे सरपंच विक्रम भोर, नगदवाडी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश बढे, संचालक विश्वास बढे, शिवशंकर मांडे, यशवंत बढे, रघुनाथ बढे, शांताराम काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.