पुणे

216 पैकी दोनच ठिकाणी ‘वाय फाय’ ; संथगती कामामुळे वाय फाय सेवा सुरू करण्यास विलंब

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने संपूर्ण शहरात 49 वाय-फाय सेंटरसाठी पोल बसविण्यात येणार आहेत. तसेच, महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व दवाखाने, करसंकलन कार्यालये, गोदाम व इतर ठिकाणी 167 इन हाऊस वाय-फाय बसविण्याचे नियोजन आहे. यापैकी महापालिका भवन व वायसीएम रुग्णालय या दोनच ठिकाणी वाय-फाय सेवा 15 ऑगस्टला कार्यान्वित केली जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या संथगती कामामुळे वाय फाय सेवा सुरू करण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.

स्मार्ट सिटीच्या वतीने संपूर्ण शहरात भूमिगत केबल नेटवर्किंगचे जाळे निर्माण करून निगडी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरद्वारे संपूर्ण शहरावर 24 तास वॉच ठेवण्याचे नियोजन होते; मात्र मुदत संपूनही अद्याप कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर 100 टक्के कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे त्याचा संपूर्ण शहराला फायदा होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि त्याचे जोड फायबर केबल नेटवर्किंगला देण्याचे काम सुरू आहे. ते काम झाल्यानंतर कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा दावा स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी केला आहे. शहरात तसेच, पालिका कार्यालयात वाय फाय यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, दीड ते दोन वर्षे झाले तरी, अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यापैकी महापालिका भवन व वायसीएम रुग्णालय असे दोन ठिकाणी वाय फाय येत्या 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर सुरू करण्याचे नियोजन आहे. त्या वाय फायद्वारे इंटरनेटचा लाभ पालिका व वैद्यकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच, नागरिकांना घेता येणार आहे. टप्प्याटप्प्याने पालिकेच्या उर्वरित 165 ठिकाणी इनहाऊस वाय फाय सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी 49 वाय फाय सेंटर सुरू करण्यात येणार आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पॅनसिटीअंतर्गत वाय फाय स्पॉट
स्मार्ट सिटीच्या वतीने संपूर्ण शहरात पॅनसिटीअंतर्गत इंटरनेटसाठी वाय फाय स्पॉट निर्माण करण्यात येणार आहेत. पिंपरी येथील महापालिका भवन आणि वायसीएम रुग्णालय या दोन ठिकाणी वाय फाय सेवा येत्या 15 ऑगस्टला सुरू करण्याचे नियोजन आहे, असे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT