पुणे : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी (दि. २८) खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) निसर्गरम्य परिसरात एक रात्र मुक्काम केला. एनडीएच्या १५१ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅडेट्ससह त्यांच्या आई-वडिलांची आणि आजी-आजोबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कॅडेट्स आणि त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला.
एनडीएच्या १५१ व्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड' रविवारी पार पडली. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कॅडेट्सशी संवाद साधत त्यांच्या यशाचे कौतुक केले. कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्व कॅडेट्सचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की काही वर्षांपूर्वी दैनंदिन गरजांसाठी आपल्या कुटुंबावर अवलंबून असलेले हे तरुण आता अशा नेतृत्वाच्या भूमिकेत घडले आहेत, की ते भविष्यात हजारो सैनिकांची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतील. एनडीएमधील प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. ही बाब देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
लष्करी सेवेत असताना सैनिकांच्या कुटुंबीयांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, याकडेही संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहणे, दुर्गम भागांत नियुक्ती होणे आणि कुटुंबातील महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहता न येणे, अशा अनेक अडचणी सैनिकांच्या आयुष्याचा भाग असतात.
मात्र, सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत असताना त्यांचे कुटुंबीयही तितक्याच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि त्यागात कुटुंबीयांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे सैनिकांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
कॅडेट्सच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा संरक्षणमंत्र्यांचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष ठरला. एनडीएतील कठोर प्रशिक्षणातून सैन्यदलासाठी सक्षम नेतृत्व घडत असताना त्यामागे कुटुंबीयांचे प्रेम, पाठबळ आणि त्यागही तितकाच महत्त्वाचा असल्याचा संदेश या भेटीतून त्यांनी दिला.