पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविणे सोपे नाही. मात्र, ते अशक्यही नाही. त्यासाठी इंडिया आघाडीने समोर अजेंडा ठेवून काम केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पुण्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर ते पत्रकारांशी अनौपचारीकरीत्या बोलत होते. यादव म्हणाले, इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून विसंवाद होऊ शकतो. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड येथील लोकसभेचे निकाल निर्णायक ठरतील.
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन ठिकाणी काँग्रेस पराभूत झाली, तर तेलंगणामध्ये विजयी झाली. मात्र, काँग्रेसला एकूण मते भाजपपेक्षा अधिक मिळाली. एवढीच मते लोकसभा निवडणुकीत पडल्यास, काँग्रेसला दहा ते पंधरा जागा सहज मिळतील. बिहार,
महाराष्ट्र, तामिळनाडू, झारखंड येथे इंडिया आघाडी होईल. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा येथे काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होईल. त्यामुळे इंडिया आघाडी भक्कमपणे लढू शकेल. त्यांना भाजपला पर्याय देणारा कार्यक्रम मतदारांसमोर मांडावा लागेल. त्या आधारे ते निवडणुकीत टक्कर देऊ शकतील, असे मत यादव यांनी व्यक्त केले.
हेही वाचा