पुणे

पिंपरी : भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी भाजपला पराभूत करा : माजी मंत्री छगन भुजबळ

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : विरोधी बोलणार्‍या प्रत्येकाला जेलमध्ये डांबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर, खोट्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकावून त्यांचा वापर करून घेण्याचे कुटील राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे. त्यांच्या या बेबंद कारभाराला आळा घालण्याची सुरवात चिंचवडच्या पोटनिवडणुकीने होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी, आ. आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, प्रकाश गजभीये, रविकांत वर्पे, महेश शिंदे, ईश्वर बाळबुधे, देवदत्त निकम, सलील देशमुख, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, संजय राऊत त्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत होते. त्यांना तुरुंगात डांबले. नवाब मलिक विरोधात बोलत, त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवले. अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवले. मला जामीनावर बाहेर आहात, अशा धमक्या दिल्या जातात. असली दडपशाही या देशाने आणीबाणीतही अनुभवली नव्हती. शरद पवार व अजित पवार यांनी दूरदृष्टीने पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केला. मात्र हे शहर भकास करण्याचे काम भाजपा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना संपविण्याचा डाव
सीबीआय व ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर भाजप सत्ताधार्‍यांनी केला. निवडणूक आयोग व न्याय संस्थांवरही दबाव आणून अख्खा पक्ष एका गटाच्या झोळीत घालण्याचे पाप या सरकारने केले. आम्हीही शिवसेना सोडली. राज ठाकरे यांनी सोडली. नारायण राणेंनी सोडली. पण शिवसेना संपवावी, अशी भावना कोणीही व्यक्त केली नाही. एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून त्यांना ईडी व सीबीआयच्या धमक्या देऊन शिवसेना संपवण्याचा कट भाजपाने आखला. निवडणूक आयोगातील आपल्या हस्तकांमार्फत तो अंमलात आणण्याचे प्रयत्न केले, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT