चितळ, हरणे ‘क्वारंटाईन’! साथीच्या भीतीने प्रशासन सतर्क Pudhari
पुणे

Pune News: चितळ, हरणे ‘क्वारंटाईन’! साथीच्या भीतीने प्रशासन सतर्क

चितळांसाठी स्वतंत्र अ‍ॅनिमल कीपरची नेमणूक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सोळा चितळांच्या अचानक मृत्यूने खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करीत उर्वरित चितळांना ‘क्वारंटाईन’ केले आहे. संभाव्य साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. सध्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असले, तरी तपासणी अहवाल येईपर्यंत अत्यंत खबरदारी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून घेतली जात आहे.

दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाहणी केली. त्यानंतर प्रतिनिधींनी येथील संचालक डॉ. राजकुमार जाधव आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, चितळांचा इतर प्राण्यांशी संपर्क पूर्णपणे थांबवला आहे. (Latest Pune News)

चितळांसाठी स्वतंत्र ’अ‍ॅनिमल कीपर’ची (कर्मचारी) नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय, चितळांच्या खंदकात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर आणि जंतुनाशकाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. खंदक परिसराचे ब्लिचिंग पावडरने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

चितळांना माणसांच्या सततच्या संपर्कामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या खंदकांवर हिरवे कापड टाकून आच्छादन करण्यात आले आहे. तसेच, खंदकात फक्त एकाच कर्मचार्‍याला प्रवेश दिला जात आहे. इतर कर्मचार्‍यांच्या हालचाली थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय चितळांच्या खंदकात काम करणार्‍या कर्मचार्‍याला इतर प्राण्यांच्या खंदकात जाण्यास बंदी केली आहे.

प्राणिसंग्रहालयातील 16 चितळांचा मृत्यू जर साथीच्या आजाराने झाला असेल, तर हा आजार इतर प्राण्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चितळांचा इतर प्राण्यांशी संपर्क होऊ नये, याची आम्ही विशेष काळजी घेत आहोत. आम्ही इतरकर्मचार्‍यांना चितळाच्या खंदकात ये-जा करण्यापासून रोखले आहे. यासाठी आम्ही एक स्वतंत्र अ‍ॅनिमल कीपर नियुक्त केला असून, तोच कर्मचारी चितळ हरणांच्या खंदकातील सर्व काम पाहत आहे. या कर्मचार्‍याला देखील इतर प्राण्यांच्या खंदकात जाण्यास मनाई आहे. याव्यतिरिक्त, या प्राण्यांच्या खाद्यपदार्थांवरआम्ही विशेष लक्ष ठेवत आहोत.
- डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
चितळ प्राण्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही तपासणीसाठी जैविक नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवले आहेत आणि त्यांचा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत येणे अपेक्षित आहे. या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही चितळांच्या खंदकाचे प्रवेशद्वार आणि संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच, आम्ही स्वतंत्र अ‍ॅनिमल कीपरची नेमणूक केली असून, 24 तास चितळांवर देखरेख ठेवली जात आहे. इतर कर्मचार्‍यांचा चितळांशी संपर्क थांबवण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा आहे.
- डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT