मंचर: या वर्षी वातावरणातील बदलाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे. वाढत्या तापमानामुळे आंब्याचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. कोकणचा हापूस आंबा मंचर येथे मल्हारराव बाबूराव आणि कंपनीच्या अभिनव आंबा विक्री केंद्रामध्ये दीड महिन्यांपूर्वी दाखल झाला आहे. स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतर हापूससह सर्वच आंब्याचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे.
मंचर बाजारपेठेत रत्नागिरी, देवगड हापूस आंबा विक्रीसाठी आला होता. सध्या हा आंबा सर्वसामान्यांच्या काहीसा आवाक्यात आला आहे. मात्र, आंब्याचा हंगाम कमी होऊन आवक घटली आहे. सध्या आंब्याला डझनला प्रतवारीनुसार 400 ते 1400 रुपये असा भाव मिळत आहे. स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतर हे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे.
मंचर येथील अभिनव आंबा केंद्रात आतापर्यंत आंब्याची सुमारे 15 हजार पेटी आवक झाली. या वर्षी आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे सुरुवातीला भाव जास्त होते. मात्र, आता ते काहीसे कमी झाले आहेत. अक्षयतृतीयेच्या दरम्यान कमी मालामुळे आंब्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.-सतीश बेंडे पाटील, अभिनव आंबा विक्री केंद्र, मंचर.
देवगड येथील हापूस आंब्याचा हंगाम केवळ 12 दिवसांचा राहणार आहे. त्यानंतर या आंब्याची आवक मंदावणार आहे. मे महिन्यात स्थानिक आंबा बाजारात येईल. त्यावेळी बाजारभाव आवाक्यात येतील. सध्या दिवसाला एक हजार पेटीपर्यंत हापूस आंबा विकला जात आहे.-सुनीलअण्णा पोखरकर, अभिनव आंबा विक्री केंद्र, मंचर.