पुणे

चाकण : जिवे मारण्याची धमकी देत गौणखनिजाची मागणी

अमृता चौगुले

चाकण; पुढारी वृत्तसेवा : जिवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात गौणखनिजाची मागणी करण्यात आली. हा प्रकार दि. 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकणजवळील खराबवाडी परिसरात घडला. गणेश नंदू राऊत (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ मुकुंद काचोळे (वय 23), विठ्ठल राजकुमार दशवंत (वय 21), हृतिक रमेश माकर (वय 21, तिघे रा. रोहकल, ता. खेड), ओंकार बापू रसाळ (वय 21, रा. भाम, ता. खेड) आणि मयूर संतोष इंगळे (वय 22, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ याने फिर्यादी यांना फोन करून खराबवाडी येथील एका सोसायटीच्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे गौणखनिज त्याला देण्याची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी गौणखनिजाची रक्कम सांगितली. त्यावरून सोमनाथ याने फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली. तसेच गौणखनिज दिले नाही, तर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी गौणखनिज खंडणी स्वरूपात देण्याची मागणी करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT