पौड : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या प्लस व्हॅली येथील खोल पाण्याच्या कुंडात पडलेल्या तरुणाचा मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीला यश आले आहे. मृतदेह कुंडातून बाहेर काढल्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरी व डोंगरातून हा मृतदेह वर आणण्यात आला. अजित मोतीलाल कश्यप (वय 23, सध्या रा. खराडी, मूळगाव दिल्ली) हा अभिजित रोहिला, आलोक रावत, प्रभाकर पवार, ओंकार साधले या मित्रांसमवेत मुळशी तालुक्यातील डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली येथे ट्रेक करण्यासाठी आला होता.
प्लस व्हॅलीत पुणे-रायगडहद्दीवर मोठे तीन कुंड असून, त्यातील एक नंबर कुंडात अजितचे दोन साथीदार पोहण्यासाठी उतरले. अजित कुंडात उतरत असताना तोल न सावरल्याने खडकावरून घसरत खाली पडला. पाण्यात असलेल्या दगडावर पडल्याने त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागल्याने घाबरत तो हात-पाय मारू लागला. तेव्हा जवळच असलेल्या पर्यटकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत अजित पाण्याखाली गेला होता. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला व मोबाईलला रेंज शोधत 112 वर फोन करून मदत मागितली. अजितच्या मित्रांनी त्याच्या घरी अपघाताचे कळविले.