पुणे

माळेगावातील विवाहितेचा नवजात बालकासह मृत्यू

अमृता चौगुले

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा: बाळंतपणासाठी सरकारी दवाखान्यात उपचार घेत असताना नवजात बालक व विवाहितेचा मृत्यू झाला. पायल सिद्धांत भोसले (वय 20, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) असे या विवाहितेचे नाव आहे. पायल यांचा दहा महिन्यांपूर्वी सिद्धांत भोसले यांच्याशी विवाह झाला होता. त्या दौंड येथे बाळंतपणासाठी गेल्या होत्या. त्यांना प्रसूतीसाठी दौंडला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा पायल यांचे सिझर केले असता नवजात पुरुष जातीचे बालक मृत जन्माला आले.

मात्र, सिझर करताना मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दौंडमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांना ससूनला हलविण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे.

रिपाइंचे माळेगाव शाखेचे माजी अध्यक्ष भगवान अण्णा भोसले यांच्या त्या सूनबाई होत. दहा महिन्यांपूर्वी पायलचा विवाह झाला होता. ती मनमिळावू स्वभावाची होती. पायलच्या निधनामुळे माळेगाव बुद्रुक नगर पंचायत परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, दौंड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा व त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप पायलचे वडील दिलीप दादू साळवे (रा. दौंड) यांनी केला आहे. त्यांनी याबाबत दौंड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT