पुणे: ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी मयत पास देणारे केंद्र मागील दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मयत पास मिळवण्यासाठी त्यांना येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय किंवा कमला नेहरू रुग्णालयात जावे लागत आहे.
ससून रुग्णालयात दररोज 20 ते 25 मृत्यू होतात. त्यामुळे येथे स्वतंत्र मयत पास केंद्र कार्यरत आहे. मात्र, सध्या ते केंद्र बंद आहे. कारण, तेथे नियुक्त केलेले पुणे महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. (Latest Pune News)
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे या केंद्रासाठी कर्मचारी नेमले गेले होते. परंतु, सध्या त्यापैकी एक कर्मचारी सुटीवर असून उर्वरित दोन जण सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांची कमतरता जाणवत आहे.
महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, तेथे तीन कर्मचारी तिन्ही पाळ्यांमध्ये कार्यरत होते. आता सध्या कोणीही उपलब्ध नाही, पण लवकरच नवीन कर्मचारी नियुक्त केले जातील.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी सांगितले, या परिस्थितीची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. लवकरच उपाययोजना होईल.