पुणे

काठापूर येथे आढळला बिबट्याचा मृत बछडा

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील गणेशनगर शिवारात अंदाजे चार ते पाच महिन्यांचा नर जातीचा बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाने त्याचा पंचनामा करून त्याच्यावर तेथेच अंत्यसंस्कार केल्याची माहिती धामणी येथील वनपाल सोनल भालेराव यांनी दिली. काठापूर बुद्रुकच्या गणेशवस्ती शिवारातील सुरेश जाधव हे सकाळी काठापूर-जारकरवाडी रस्त्याने जात होते. या वेळी त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूला शेताच्या कडेला बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला.

त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, वनपाल सोनल भालेराव, रक्षक साईमाला गित्ते, वन कर्मचारी अशोक जाधव, रेस्क्यू टीम सदस्य रामदास वळसे, सोपान करंडे, ऋषिकेश कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे यांनी बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन करून वन खात्याच्या वतीने तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

मृत बिबट्याचा बछडा हा नर जातीचा असून, अंदाजे चार ते पाच महिने वयाचा आहे. बिबट्याच्या एकमेकांच्या हल्ल्यात तो मृत्युमुखी पडला असावा, असा अंदाज वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केला आहे. काठापूर परिसरातील शेतकरी, नागरिक यांनी रहदारी करताना सावधानता बाळगावी. विशेष करून सायंकाळी बाहेर पडताना एकट्याने बाहेर पडू नये. परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत आहे, असे वनपाल सोनल भालेराव यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT