पुणे

पिंपरी : पवना नदीपात्रात पुन्हा आढळले मृत मासे

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  :  शहराची जीवनदायिनी पवना नदीपात्रामध्ये थेरगाव येथील केजुदेवी बंधार्‍याजवळ मंगळवारी (दि. 13) पुन्हा अनेक मृत मासे आढळून आले. तसेच, नदीपात्रात फेसयुक्त पाणी पाहण्यास मिळाले आहे. जल प्रदूषणामुळे जलचर पाण्यांचे अस्तित्त्व धोक्यात येत असल्याचे चित्र यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत ठोस उपाययोजना करत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.
मच्छीमार हे मृत मासे जमा करत होते.

केजुदेवी बंधार्‍याजवळ मासे मृत होण्याचे प्रकार यापूर्वीदेखील घडलेले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने त्या वेळी पाण्याचा व मृत माशांचा नमुना घेण्यात आला होता. तसेच, याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून याबाबत जुजबी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अद्यापही येथील जलप्रदूषणाच्या समस्येवर उत्तर सापडलेले नाही. केजुदेवी बंधार्‍याजवळ पुन्हा अनेक मृत मासे आढळल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

थेरगाव सोशल फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी या मुद्दयावर महापालिका पर्यावरण विभागाचे सह-शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणुन दिली. नदीपात्रात मृत पडलेल्या काही मासेदेखील त्यांनी कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच, याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी केली.

जलपर्णी, सांडपाणी कारणीभूत

पवना नदीपात्रामध्ये केजुदेवी बंधार्‍याजवळ साचलेल्या जलपर्णीमुळे नदीपात्रात सूर्यकिरणे पोहोचत नसल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाले असावेत, असा एक अंदाज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. तथापि, रावेत ते केजुदेवी बंधारा या पट्ट्यात नदीपात्रात 5 ते 6 नाल्यांच्या माध्यमातून थेट मिसळणारे सांडपाणी देखील त्याला कारणीभूत आहे, अशी माहिती एमपीसीबीच्या उपप्रादेशिक अधिकार्‍यांनी दिली.
एमपीसीबीला काय आढळले ?
केजुदेवी बंधार्‍याजवळ जेथे मृत मासे आढळले तेथील पाण्याचा व माशांचे नमुन एमपीसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. रावेत येथे खालच्या बाजूला असलेल्या सांडपाणीप्रक्रिया प्रकल्पात सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे त्यांना तपासणीत आढळले आहे. त्याशिवाय, रावेत ते केजुदेवी बंधार्‍यादरम्यान 5 ते 6 नाले सांडपाण्यावर प्रक्रिया न होता थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

पवना नदीपात्रात जलपर्णी वाढल्यामुळे हे मासे मृत झाल्याचा अंदाज आहे. येथील जलपर्णी काढण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहे. एमपीसीबीने येथील पाण्याचे नमुने घेतले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मासे मृत होण्याचे नेमके कारण समजू शकेल. नदीपात्रात कोणी रासायनिक सांडपाणी सोडले आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.
– संजय कुलकर्णी, सह-शहर अभियंता (पर्यावरण), महापालिका.

ठोस उपाययोजनांचा अभाव
पवना नदीपात्रात मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र, याबाबत महापालिका पर्यावरण विभाग ठोस उपाययोजना करू शकलेले नाही. पुरेशा गांभीर्याच्या अभावामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत. नदीमध्ये फेसयुक्त पाणी नेमके कोठून येते? मासे आणि जलचर मृत पावण्याचे कारण काय, याचा शोध लागायला हवा.

SCROLL FOR NEXT